Mayo Hospital Tendernama
विदर्भ

Nagpur : 'मेयो'तील परिस्थिती; बेड वाढले पण मनुष्यबळ कधी वाढणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मेयो रुग्णालयात 500 बेडची भर लवकरच पडणार असून 1300 बेडचे मेयो होणार आहे, मात्र अल्प मनुष्यबळाच्या भरवशावर येथील आरोग्याचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अवघ्या 592 बेड होते. त्यावेळी पुरेसे मनुष्यबळ होते. मात्र नंतर हळुहळू येथे बेडची संख्या व रुग्णसंख्या वाढत गेली. परंतु डॉक्टर वगळता आवश्यक मनुष्यबळ कमी होत गेले. सध्या येथे बेडची संख्या साडेआठशेवर आहे. त्यात पाचशे बेड वाढणार आहेत.

मेयो 1981 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाशी जोडले गेले. त्यावेळी 60 एमबीबीएस विद्यार्थी क्षमता होती. यानंतर 1997 मध्ये 40 एमबीबीएसच्या जागांची भर पडून एमबीबीएस विद्यार्थी क्षमता 100 झाली. 2019 मध्ये येथील एमबीबीएस विद्यार्थी क्षमता 200 वर गेली. तर 123 पदव्युत्तर (एमडी) अभ्यासक्रमाचे विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. 592 बेडमध्ये मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये बेडची भर पडली. शासनाने निधी देऊन मेयोचा विकास सुरू केला. इमारतींचा डोलारा उभा केला, मात्र मनुष्यबळाच्या संख्येत हळुहळू घट होत गेली. कर्तव्यावर असलेले कर्मचारी, परिचारिका निवृत्त होत गेल्या, मात्र त्यांची पदे भरण्याची प्रक्रिया शासनाने न राबवता, उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णसेवा सुरू ठेवली. यामुळे येथील उपचाराचा दर्जा खालावला.

एक वेळ अशी आली, की सरकारच्या अंदाज समितीने मेयो नव्हे, हा तर कत्तलखाना आहे, अशा शब्दात मेयोची विटंबना केली. मात्र ढिम्म प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. सर्जिकल कॉम्प्लेक्स, प्रशासकीय विंग, रेडिओलॉजीतील सीटी स्कॅन, एमआरआय यंत्रासह एमडी मानसोपचार विभाग मेयोत वाढत गेले. नुकतेच 2023 मध्ये विद्यमान सरकारने 319 कोटींचा निधी मेयोला देण्याचे कबूल केले. यात मेडिसिन ब्लॉक, एमबीबीएसच्या 200 आणि एमडीच्या 120 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. मात्र मनुष्यबळ मात्र कमी असल्याने आरोग्यसेवेचा दर्जा राखता येणार नाही, हे विदारक सत्य आहे.

ड्रेसर, परीट, बार्बरची पदे रिक्त

मेयो सुरू झाल्यापासून येथे ड्रेसर पासून तर परीट आणि 'ऑटोक्लेव्ह परिचर, बार्बर पदांची आस्थापना येथे तयार करण्यात आली नाही. ही पदे नसतानाही रुग्णालयात ड्रेसर पर्यंतची सर्वच कामे इतर कर्मचाऱ्यांच्या हातून होत आहेत. या कामाचा बोझा मेयोतील अटेंडंट्स वर पडतो. मेयो मध्ये स्वीकृत परिचर-492, रिक्त पदे- 145, मंजूर चतुर्थश्रेणी कर्मचारी-321, रिक्त पदे - 160 इतकी आहेत.