Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल; खड्डे ठरताहेत जीवघेणे!

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : पावसाळ्याला सुरूवात झाल्यापासून शहरातील रस्त्यांचे बेहाल आहेत. नगरपालिका प्रशासनाने भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदले. या खोदकामांत आता पाणी व चिखलांचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच शहरातील राजीव गांधी चौक, खांब तलाव आणि मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांना जणू खड्यांची कीड लागल्यासारखी अवस्था आहे.

पावसाळ्याच्या प्रारंभी भूमिगत गटारांसाठी सिमेंट रस्ते तोडून नाल्या खोदण्यात आल्या. लगेच मातीने बुजविण्यात आली असली तरी पावसामुळे माती दाबल्या जाऊन खोलगट भाग तयार झाले आहेत. या खोलगट भागात पाणी साचून दलदलयुक्त चिखल तयार झाला आहे. अनेक ठिकाणी ब्रेकर तयार झाल्यासारखी परिस्थिती आहे. वाहने उंचवट्यांवरून जाताच संतुलन बिघडते व अपघात होत आहेत.

जिल्हा परिषद चौक ते शितलामाता मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, शितलामाता मंदिरापासून रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता अद्यापही डांबरीकरणाचाच आहे. पावसाळ्यात डांबर रस्ते उखडून खोल खड्डे व आडव्या नाल्या पडल्या आहेत. पावसाचे पाणी यामध्ये साचून राहिल्यास खड्ड्यांचा अंदाज येत नाही. शितलामाता मंदिरासमोर पडलेली खोल आडवी नाली वाहतूकदारांचे कंबरडे मोडत आहे.

राजीव गांधी चौकाकडून मुस्लिम लायब्ररी चौकाकडे व पुढे पोस्ट ऑफिस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्रिमुर्ती चौकाकडून अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतच्या रस्त्याची अवस्थाही चांगली नाही. वाहतूकदार या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कमालीचे त्रस्त आहेत.

चिखलात फसतात वाहने...

भंडाराकडून तुमसरकडे जाणाऱ्या महामार्गावर खांब तलाव परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु, खोदकामातील खड्डयांत पाणी साचून रस्त्याच्या कडेला दलदलयुक्त भाग तयार झाला आहे. या भागात अवजड वाहने चिखलात फसण्याचा प्रकार नेहमीचा झाला आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने वाहन चालकांचे जीव धोक्यात आहेत.

बांधकाम विभाग केव्हा जागा होणार?

शितलामाता मंदिर ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी यापूर्वी नागरिकांनी आंदोलन केले होते. परंतु, आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. परिणामी मार्गावर अपघात होत आहेत. यापूर्वी येथील खड्यांत पडून एका शिक्षकाचा जीव गेला होता. त्यावेळी नागरिक आक्रोशीत होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. आणखी बळी गेल्यानंतरच प्रशासन जागणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.