Wardha Tendernam
विदर्भ

Mahatma Gandhi : सेवाग्राममध्ये साकारतेय जगातील दुसरे कायनेटिक पोट्रेट

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार कायम आहे. इतकेच नाही तर यांचे हे विचार, तत्त्व आणि सिद्धांत सातासमुद्रापार पोहोचले आहे. त्यामुळे अशा महान व्यक्तीचे जीवनदर्शन आणि महती नव्या पिढीला ज्ञात व्हावी म्हणून सेवाग्राम विकास आराखड्यातून प्रयत्न केले आहेत. नुकताच सेवाग्रामातील नवीन इमारत परिसरात भी. एम. मेटलच्या साहाय्याने बापूंचे पोट्रेट साकारले जात आहे. मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे कर्मचारी याकरिता परिश्रम घेत असून, हे जगातील दुसरे कायनेटिक पोट्रेट असणार आहे.

जगातील पहिले मेटलचे पोट्रेट नेल्सन मंडेलाचे बनविण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील नाटाल येथील अधिक या स्थानावरून डॉ. नेल्सन मंडेला यांना 1964 मध्ये अटक करण्यात आली होती. 2012 मध्ये त्या स्थानावर संग्रहालय बनविण्यात आले. तेथे मेटलमध्ये त्यांचे पोट्रेट तयार करण्यात आले असून, मुख्य मार्गाने ये जा करणाऱ्यांना ते कायनेटिक पोट्रेट दृष्टीस पडते.

सेवाग्राम विकास आराखड्यातून जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी भंगाराच्या साहित्यातून महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे शिल्प तयार केले, जगातील सर्वांत मोठा चरवाही त्यांनी साकार केला असून, पर्यटकांना खुणावत असतात. आता यातीलच एक भाग म्हणून सेवाग्राम आश्रम मार्गावरील जमनालाल बजाज ग्रंथालय आणि संशोधन केंद्र तसेच प्रदर्शनाच्या परिसरात मुख्य मार्गालगत 'कायनेटिक गांधी' हे पोट्रेट साकारण्यात येत असून, आणखी एका सुंदर कलेचा नमुना पर्यटकांना पाहायला मिळणार आहे.

महिन्याभराच्या कालावधीत होणार पूर्ण

कायनेटिक गांधी पोट्रेटची लांबी 30 फूट रुंदी 20 फूट आणि उंची 28 फूट आहे. पोट्रेट 40 मेटल पिलरवर तयार होत असून, लेझरच्या माध्यमातून कापलेल्या प्लेट्स वापरल्या जात आहेत. सध्या प्लेट्स लावण्याचे काम सुरू असून तीस दिवसांच्या कालावधीत हे पोट्रेट पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याची डिझाइन विनय पाटील यांनी तयार केली असून, मोहम्मद आरिफ मोहम्मद आमि शेख व अस्लम शेख परिश्रम घेत आहेत.

याला कायनेटिक गांधी असे नाव दिले आहे. एका विशिष्ट जागेवरून पाहिल्यावर गांधीजी दिसून येतील हे याचे वैशिष्ट्ये आहे. अंतिम टप्प्यात काम झालेले असून, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या अंतर्गत आणि सेवाग्राम विकास आराखड्यात बनविले जात आहे. ही फार सुंदर अशी कल्पना असल्याचे मुंबई जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डिझायनर विनय पाटील म्हणाले.