Nagpur Tendernama
विदर्भ

हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात ३५ टक्के वाढ; ६० कोटींचे टेंडर काढणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तब्बल दोन वर्षानंतर यंदा हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपुरात होणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली असून यंदाचे हे अधिवेशन अधिक खर्चिक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अधिवेशनाच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिकचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. खर्चाचा आराखडा बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे.

कोरोनामुळे वर्ष २०२० व २०२१ ला हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. कोरोनामुळेच सर्वच अधिवेशन मुंबईला झाली असली तरी त्याचा कालावधीही कमी होता. नागपुरात होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याच करार आहे. परंतु गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंना तीन आठवड्यांचे होते. यंदाचे अधिवेशनही किमान दोन आठवड्यांचे होण्याची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचे संकेत दिले आहे. दुसरीकडे प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. यासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे सज्ज करण्यात येणार आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसह रंगरंगोटीची कामे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांचीही डागडुजी करण्याच येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यांना खर्चाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. यापूर्वी अधिवेशनानिमित्त होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत यंदा ३५ ते ४० टक्के वाढ होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जीएसटी, सीएसआरच्या दरात वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे कामेही वाढणार असून साहित्यही खराब झाले. नव्याने खरेदी करावे लागणार असल्याने खर्चात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.

विधानभवनावर होणार ६० ते  ७० कोटींचा खर्च
विधानभवनावर ६० ते ७० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. २०० ते २२५ कामे करण्यात असून प्रत्येक कामाचे टेंडर काढण्यात येणार आहे. काही कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामांना सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.