Water Tendernama
विदर्भ

Nagpur: 20 गावांना मिळणार मुबलक पाणी; पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : काटोल जलजीवन मिशन अंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात 2022-23 मध्ये 209 गावासाठी पाणी पुरवठ्यासाठी तब्बल 72 कोटी, 73 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु यानंतरही काही गावात पाणीपुरवठा योजना नव्याने मंजूर करण्याची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्य तथा जलव्यस्थापन समितीचे सदस्य सलील देशमुख यांनी पुरक आराखडामध्ये ही गावे मंजुरीसाठी टाकली होती. अशा एकूण 20 गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी, 11 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.

गावागावांत योग्य पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे येणाऱ्या पंधरा वर्षांचा विचार करून आराखडा तयार करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जी कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी बरीच कामेही झाली असून काही कामे प्रगती पथावर आहे. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहे. तेथे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यात बराच फायदा झाला आहे. काही गावात पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची आवश्यकता होती. यावरून सलील देशमुख यांनी जलव्यवस्थापन समितीमध्ये सातत्याने या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपूरावा केला.

या 20 गावांमध्ये काटोल तालुक्यातील खामगाव, मोहगाव जं., पांजरा काटे, सावळी बु., बंडली वाघ, जटामजरी, मलकापूर, सोनमोह या आठ गावांचा समावेश आहे. या आठ गावांसाठी आहे. तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसेच नरखेड तालुक्यातील बानोरचंद्र, सहजापूर, लोहारा, जलालखेडा, गुमगाव, मोहदी दळवी, नायगाव ठाकरे, नारसिंगी, रामठी, तारा, हिवरमठ व बेलोना या 12 गावांसाठी 9 कोटी 86 लाख मंजूर करण्यात आले. यातील जलालखेडा व बेलोना ही गावे मोठी असल्याने येथे पाणीपुरवठा योजनेसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहितीसुद्धा सलील देशमुख यांनी दिली.

काटोल, नरखेड तालुका हा टँकरमुक्त

जेव्हापासुन सलील देशमुख हे जिल्हा परिषदेमध्ये जलव्यवस्थापन समितीचे सदस्य झाले, तेव्हापासून काटोल व नरखेड तालुक्यातील पाणीपुरावठा योजनेकडे विशेष लक्ष दिले. उन्हाळाच्या दिवसात काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु सलील देशमुख यांनी संबंधीत गावांनमध्ये योग्य नियोजन केल्यामुळे यावर्षी एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली नाही. त्यामुळे काटोल, नरखेड तालुका हा टँकरमुक्त झाला आहे.