Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 100 कोटी निधी मिळूनही कासवगतीने का सुरु आहेत तलाव पुनरुज्जीवनाची कामे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्य सरकारकडून 100 कोटी रुपये मिळाल्यानंतरही शहरातील गांधीसागर, सोनेगाव आणि सक्करदरा तलावाचे काम कासवगतीने सुरू आहे. विलंबामुळे या प्रकल्पाच्या खर्चाच्या वाढीचाही मार्ग मोकळा होत असल्याने जाणीवपूर्वक संथगतीने कामे तर केली जात नाही ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

शहरात 11 तलाव असल्याने नागपूरची ओळख तलावांचे शहर म्हणूनही आहे. परंतु महापालिकेच्या उदासिनतेमुळे ही ओळखही पुसली जात आहे. शहरातील सर्वच तलावांची दुर्दशा झाली आहे. अनेक दशकांच्या उदासिनतेनंतर महापालिकेने गांधीसागर, सोनेगाव आणि सक्करदरा या तीन तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. राज्याकडून या तिन्ही तलावांसाठी 100 कोटी रुपये मिळाले असून जानेवारी 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कामाचा वेग बघता ते शक्य नसल्याचे चित्र आहे.

कामांच्या संथगतीमुळे या तिन्ही तलावाच्या पुनरुज्जीवनाचा खर्चही वाढला आहे. वाढत्या खर्चामुळे हे तिन्ही तलाव कंत्राटदारांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी तर ठरत नाही ना, असा प्रश्न आता नागपूरकर उपस्थित करीत आहे. कामांच्या संथगतीमुळे अनेकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली. परंतु महापालिकेला त्याचेही काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात गांधीसागर तलावासाठी 31.45 कोटी, सोनेगाव तलावासाठी 17.32 कोटी तर सक्करदरा तलावासाठी 9.99 कोटी मंजूर केले आहे. गांधीसागर आणि सक्करदरा या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे महापालिकेच्या झोन कार्यालयांतर्गत सुरू आहेत. राज्य सरकारच्या निधीची प्रतीक्षा केल्याने कामांना विलंब झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही तलावांचे काम पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली. परंतु सद्यस्थितीतील झालेली कामे बघता फेब्रुवारीपर्यंत या तलावाचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान दिसून येत आहे. वर्षानुवर्षे रखडलेली सोनेगाव तलावाची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

अमृत योजनेंतर्गत चार तलावांचे खोलीकरण : 

शहरातील लेंडी, पोलिस लाईन, नाईक आणि बिनाकी तलावाची कामे करण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत लेंडी तलावासाठी 14.13 कोटी, नाईक तलावासाठी 12.95 कोटी, पोलिस लाइन तलावासाठी 8 कोटी आणि बिनाकी तलावासाठी 6.70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पण या तलावांची कामेही संथगतीनेच सुरू असल्याने तलावांबाबत महापालिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राज्याकडून सरकारकडून मिळालेला निधी : 

गांधीसागर तलाव - 31.45 कोटी,

सोनेगाव तलाव 17.32 कोटी, सक्करदरा तलाव 9.99 कोटी.

अमृत योजनेंतर्गत निधी

लेंडी तलाव - 14.13 कोटी, नाईक तलाव - 12.95 कोटी, पोलिस लाईन तलाव - 8 कोटी, बिनाकी तलाव - 6.70  कोटी