नागपूर (Nagpur) : जिल्ह्यातील एक नवे शासकीय रुग्णालय तयार होणार आहे. यासाठी जागेची चाचपणी सुरू असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत याबाबत बैठक घेतल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात मेडिकल आणि मेयोसारखे मोठे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात विदर्भाशिवाय मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णसुद्धा येतात. एक सुरप स्पेशालिटी रुग्णालय सुद्धा आहे. शिवाय मेडिकल परिसरातच एक ट्रामा केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. मिहान भागाच एम्ससारखे रुग्णालय सुरू झाले आहे. आता आणखी एक शासकीय रुग्णालय जिल्ह्यात होणार आहे. सुपरस्पेशालिटप्रमाणे हे रुग्णालय असणार असल्याचे सांगण्यात येते. मिहान परिसरात हे शासकीय रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयासाठी सहा एकर जागेची आवश्यकता असणार आहे. यासाठी मिहान परिसरात काही जागांची चाचपणी सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एम्सला लागून, पतंजली कंपनी व खापरी स्टेशन समोरील जागाबाबत विचार होत आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसाठी विशेष प्रयत्नशील आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत याबाबत एक बैठकही घेतली. याबैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीतूनच त्यांना जागेबाबतची विस्तृत माहिती मागितली. शासकीय कर्करोग रुग्णालय नागपुरात होणार होते. परंतु ते औरंगाबादला स्थानांतरित करण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळेच आता नवीन एक शासकीय रुग्णालय आणून त्याची परतफेड करण्याच्या प्रयत्नात ते असल्याचे समजते.