Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

Nagpur : झोपडपट्टीवासियांना 50 हजार पट्टे वितरणाचा लक्ष्य कधी होणार पूर्ण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या घराच्या जमिनीचा भाडे पट्टा देण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने 2017 पासून अंमलात आणली आहे. 50 हजार पट्टे वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले असताना सात वर्षात जवळपास 7 हजारच मालकी पट्ट्यांचे वितरण झाले आहे.

शासनाच्या ज्या विभागाच्या जमिनीवर झोपडपट्टी असेल त्याच विभागावर संबंधितांना पट्टे वितरित करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय नझूल विभागातर्फे भाडे पट्टा वाटपाचे काम सुरू आहे. या तिन्ही विभागापैकी सरकारी-नझूलच्या जमिनीवर सर्वाधिक झोपडपट्टी वसाहती असूनही याच विभागाचे पट्टे वाटप सर्वात कमी झालेले आहे. एप्रिल 2024 अखेरीस एनआयटी तर्फे सर्वाधिक 4 हजार 830 भाडेपट्ट्यांचे वितरण झाले असून त्या खालोखाल मनपातर्फे 1 हजार 921 पट्ट्यांचे वितरण झोपडपट्टीधारकास करून त्यांचे पट्टे पंजीबद्ध करण्यात आलेले आहेत. या दोन्ही विभागांचे मिळून 6 हजार 771 पट्ट्यांचे वितरण झाले. मात्र नझूल मधील पट्ट्यांची संख्या हजारापर्यंतही पोहोचलेली नाही.

एनआयटीच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये 10 हजार 64 घरे असून त्यापैकी 4 हजार 830 झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप झालेले आहे. प्रन्यासच्या विभाग निहाय पट्टे वाटपात सर्वाधिक पट्टे वाटप दक्षिण मध्ये 2 हजार 963 इतके झाले आहे. पूर्व-1 हजार 448, उत्तर- 320 तर पश्चिम- 99 अशी स्थिती आहे. पश्चिम मधील प्रन्यासच्या झोपडपट्ट्या झुडपी जंगलाच्या आरक्षणात अडकल्यामुळे तेथील पट्टेवाटप ठप्प आहे. मनपाच्या जमिनीवरील 16 झोपडपट्टी वसाहतीत 4 हजार 865 घरे असून त्या पैकी 1 हजार 921 झोपडीधारकास पंजीबद्ध भाडेपट्टा करून देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नझूल विभागाचे पट्टे वाटप मात्र सर्वात संथ आहे.