चंद्रपूर (Chandrapur) : नवरगाव गोसीखुर्द कालव्याच्या घोडाझरी वितरिकेचे काम मागील पंधरा वर्षांपासून नवरगाव परिसरात सुरू आहे. मात्र, कालव्याचे बांधकाम अपूर्ण असून, पाण्याचा पत्ता नसल्याने शेतकरी आजही हरितक्रांतीच्या प्रतीक्षेतच आहेत.
परिसरात मुख्य व एकमेव धानाचे पीक घेतले जाते. या पिकाला पाण्याची भरपूर गरज भासते. शिवाय धानाचे पीक तीन ते पाच महिन्यांचे असते. या परिसरात सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंग्रजांनी तयार केलेल्या घोडाझरी या तलावावर अवलंबून राहावे लागते. परंतु, मागील काही वर्षांपासून घोडाझरी तलावाच्या कालव्याच्या नियोजनाकडे अधिकाऱ्यांचे व शासनाचेही दुर्लक्ष होत आहे. शिवाय या कालव्याला विविध ठिकाणी भेगा गेल्या असून, दरवर्षी तो फुटून पाणी व्यर्थ वाहून जाते. त्यामुळे तलावात पाणी असले, तरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पोहोचत नसल्याने पाण्याअभावी पिके करपण्याची वेळ दरवर्षी शेतकऱ्यांवर येते. म्हणून गोसीखुर्दकडे शेतकरी आशा लावून बसले आहेत.
शेतकरी शेतामध्ये बारमाही पीक घ्यायला लागतील, तेव्हाच त्यांची प्रगती साधली जाईल. त्यामुळे भविष्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन मागील पंधरा वर्षांपासून नवरगाव परिसरातील जमिनी ताब्यात घेऊन गोसीखुर्द कालव्याच्या घोडाझरी वितरिकेच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. आजही काही ठिकाणी कामे सुरू आहेत. परंतु, बांधकाम अपूर्ण असल्याने या कालव्याला पाणीच आले नाही. परंतु, शेतकऱ्यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
वन्य प्राणीही पडू शकतात कालव्यात :
या परिसरात जंगल असून, वन्य प्राण्यांचा वावर आहे. काही ठिकाणी ओपन तर काही ठिकाणी अंडरग्राऊंड कालव्याचे बांधकाम सुरू आहे. वन्य प्राणी चुकून कालव्यात पडल्यास त्याला बाहेर निघण्यासाठी विशिष्ट अंतरावर पायांच्या नियोजनाची गरज आहे.