Market complex Tendernama
विदर्भ

Nagpur: 'या' मार्केटच्या जागी बनणार व्यापारी संकुल; सरकारची मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : धरमपेठ येथील गोकुळपेठ मार्केटच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अखेर सरकारकडून मंजुरी मिळाली. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि नागपूर महापालिका संयुक्तपणे नफा वाटणी तत्त्वावर याची अंमलबजावणी करणार आहेत.

या प्रकल्पाला मंजुरी देताना सरकारने एनआयटी आणि महापालिका यांना 50 टक्के खर्च आणि 50 टक्के नफा या तत्त्वावर संयुक्तपणे प्रकल्प राबविण्यास सांगितले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. एनआयटीचे चेअरमन तर सहअध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही? यासाठी नीती आयोगाने खात्री केली आहे. विविध मॉडेल्सचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून कोणते मॉडेल अधिक चांगले असू शकते, हे निवडण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.

लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर पर्यंत पार्किंग व्यवस्था

आराखडा मंजूर करताना स्थानिक वाहतूक आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन सरकारने लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक या रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकाराचे नियोजनही प्रकल्पात करण्यास सांगितले आहे. विलंब न करता ही योजना राबविण्यास सांगितले आहे.

इमारत जीर्ण झाली

मौजा गडगा येथील गोकुळपेठ बाजाराची ही जागा नागपूरच्या मालकीची आहे. या ठिकाणी एनआयटी चे 72 भाडेकरू, नागपूर महापालिकेचे 223 दुकानदार आणि 13 भाडेकरू आहेत. या ठिकाणी बांधलेली इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. ती कधीही पडू शकते. सार्वजनिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गोकुळपेठ मार्केटमधील सध्याचे दुकानदार, भाडेधारक आणि भाडेकरू यांचे पुनर्वसन नागपूर सुधार प्रन्यासाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून (बांधकाम कामाचा खर्च आकारून) भाडेकरूंशी समन्वय साधून त्याच ठिकाणी व्यापारी संकुल उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यास सांगितले आहे.