अमरावती (Amravati) : राज्य सरकारने अचलपूर-चांदूर बाजार मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी 218 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे येत्या काही दिवसांत मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली. यात परतवाडा शहर बायपास व उड्डाणपुलाचा समावेश असून, रस्ते, इमारती, जलसंपदा प्रकल्प आदी कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे.
चांदूर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह नूतनीकरणासाठी 1.20 कोटी, अचलपूर शासकीय विश्रामगृह नूतनीकरणासाठी 2.11 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधकामाकरिता 4.57 कोटी, प्रशासकीय इमारत पहिल्या मजल्याच्या बांधकामाकरिता 9.17 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तालुकास्तरावर या इमारतीत सर्व प्रशासकीय कार्यालये एकत्रित येणार आहेत. परतवाडा शहर रिंग रोड तसेच उड्डाणपूल बांधण्यासाठी 144 कोटींचा निधी मंजूर झाला. बिच्छन पूरसंरक्षक भिंतीसाठी निधी, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्प, पूर्णा मध्यम प्रकल्प व शहानूर मध्यम प्रकल्प कामांना मान्यता देण्यात आली आहे.
दोन्ही तालुक्यातील साबांविच्या रस्त्यांच्या कामांकरिता 15 कोटी मंजूर केले आहेत. अचलपूर येथे तहसील व एसडीओ कार्यालयासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये याप्रमाणे दोन कोटी, तर अचलपूर महिला व बाल रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी 11 कोटी रुपये, तहसील कार्यालय अचलपूरचे नूतनीकरण 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मातंग समाजातील युवकांना कौशल्य विकासाची संधी मिळावी, याकरिता बहुउद्देशीय केंद्र उभारण्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अचलपूर-चांदूर बाजार मतदारसंघात विविध विकासकामांसाठी 218 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रस्तावित आणि मागणी केलेली विकासकामे त्वरित प्रारंभ होतील, यंत्रणांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.