नागपूर (Nagpur) : नागपुरातील विधानभवन परिसराची जागा अपुरी पडत असल्याने विस्तारीकरणासाठी काही जागा संपादित करण्यात येणार आहे. यात विधानभवनासमोरील पुनम प्लाझाच्या इमारतीचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईत यासंदर्भात बैठक घेत कारवाईला गती देण्याचे निर्देश दिलेत.
विधानभवनाची जागा आता अपुरी पडू लागली आहे. पार्किंग, कार्यालये यासाठी जागेची गरज आहे. यातच येथे एक मोठा सेंट्रल हॉलही तयार करण्याचे प्रस्तावित आहे; परंतु, यासाठी सध्याची जागा अपुरी असल्याने विधानभवनाला लागून असलेल्या खासगी व शासकीय जागा संपादित करण्याच्या सूचना विधानसभा राहुल नार्वेकर यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच दिल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार विधानभवन समोरील पुनम प्लाझाची इमारत संपादित करण्याचे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले. यासाठी 65 कोटींची रक्कमही निश्चित करण्यात आली; परंतु, इमारत मालकाकडून त्यापेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जाते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात मुंबईत एक बैठक घेतली. बैठकीला विधिमंडळ सचिवालय, बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष नार्वेकर यांनी जागा संपादित करण्याच्या कारवाईला गती देण्याच्य सूचना केल्या. याशिवाय शासकीय मुद्रणालयाची जागा घेण्यात येईल येत्या हिवाळी अधिवेशनात यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
भुयारी मार्ग :
इमारत संपादित झाल्यावर येथे नवीन इमारत बांधण्यात येईल किंवा तिचाच उपयोग होईल, अद्याप हे स्पष्ट नाही; परंतु, या इमारतीपासून विधानभवनापर्यंत भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गातून ये-जा होणार असून रस्ता कायम राहील.
उपमुख्यमंत्री पवारांसाठी वेगळा कक्ष :
विधानभवन इमारतींमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व राज्यमंत्र्यांसाठी कक्ष आहे. यंदा दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी वेगळा कक्ष तयार करण्यात येणार आहे. हा कक्ष नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत राहण्याची शक्यता आहे.