Mahagenco Koradi Tendernama
विदर्भ

हे काय उलटंच? नागपूरमुळे कोराडीत प्रदूषण होत असल्याचा महाजेनकोचा दावा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोराडी औष्णिक वीज केंद्रामुळे नव्हे, तर नागपूर शहरात होणाऱ्या प्रदूषणामुळे कोराडी परिसरात प्रदूषण वाढले आहे. हा दावा महाजेनकोने केला आहे. एमपीसीबीने सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयात उत्तर सादर करताना महाजेनकोने हा अजब दावा केला आहे.

कोराडी वीज प्रकल्पात 660 मेगावॅटच्या दोन विस्तारित प्रकल्पाच्या प्रस्तावाविरोधात विदर्भ कनेक्टतर्फे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने कोराडीतील बी.पी. विद्यामंदिर येथे 29 व 30 जानेवारीला केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करीत या परिसरात प्रदूषणाचा स्तर वाढला असल्याचे सांगितले होते. यावर उत्तर सादर करताना महाजेनकोने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या दररोजच्या प्रदूषण निर्देशांकाचे आकडे सादर केले.

त्यांच्यानुसार एमपीसीबीने केलेल्या सर्वेक्षणाच्या दिवशी नागपूर शहराचे प्रदूषण अधिक होते आणि त्या दिवशी नागपूरकडून उत्तरेकडे शाळेच्या दिशेने हवा वाहत होती. शिवाय त्या दिवशी ढगाळ वातावरण व आर्द्रता अधिक असल्याने नागपूरकडून येणाऱ्या प्रदूषित हवेतील पीएम-10 व पीएम 2.5 हे धूलिकण त्या भागात स्थिरावले व त्यामुळे बी.पी. विद्यामंदिर परिसरातील प्रदूषण वाढले होते. विशेष म्हणजे त्या दिवशी औष्णिक वीज केंद्राच्या आसपासच्या परिसरातील प्रदूषणाचा स्तर प्रदूषण मर्यादेच्या खाली असल्याचा दावा महाजेनकोने आकडे सादर करून न्यायालयात केला आहे. प्रदूषणाचे दुसरे कारण म्हणजे कोराडीच्या रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. या वाहतुकीमुळेसुद्धा प्रदूषण वाढत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.