गोंदिया (Gondia) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार असून समृद्धी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शासनाने घोषित केल्याप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये बोनस देण्यात येत आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख 12 हजार शेतकऱ्यांना 166 कोटी प्रोत्साहन राशी देण्यात आली आहे. कोतवालांचे मानधनात वाढ करून आता 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
नक्षलग्रस्त भागातील 111 युवकांना रोजगाराची संधी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त घरकुल पूर्ण केल्यामुळे महाआवास-1 मध्ये गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार नवयुवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने सुरक्षा जवान या पदाकरिता सहा नक्षलग्रस्त पोलिस स्टेशनस्तरावर रोजगार मेळावे घेऊन 111 पात्र युवकांची निवड करून त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. तसेच पोलिस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत पोलिस प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले तयार करण्यासाठी सहा नक्षलग्रस्त पोलिस स्टेशन व 11 सशस्त्र दूरक्षेत्र स्तरावर वेगवेगळ्या तारखेस शिबिरे आयोजित करून विविध प्रकारचे तीन हजार दाखले तयार करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
21 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण 23 हजार 767 शेतकरी पात्र झालेले आहेत. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु असून गोंदिया जिल्ह्यातील पोर्टल- नुसार 23 हजार 153 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी 21 हजार 40 शेतकऱ्यांना 67 कोटी रुपयांचा लाभ मिळालेला आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयात विमा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीकविमा काढता येणार आहे. ही बाब शेती विकासाला चालना देणारी आहे. शासनाने मुलींच्या सक्ष- मीकरणासाठी 'लेक लाडकी योजना आता नव्या स्वरुपात आणली असून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पारंपरिक मासेमारी करणाच्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने पाच लाखांचा विमा देण्यात येणार आहे.
108 वैद्यकीय आप्तकालीन सेवेचा एक लाख 67 हजार लोकांनी घेतला लाभ
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहे. या योजनेत अल्प उत्पन्न असलेल्या पिवळा व केशरी कार्डधारकांना लाभ देण्यात येतो. मार्च 2023 पर्यंत 35 हजार 183 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 108 वैद्यकीय आप्तकालीन सेवेचा एक लाख 60 हजार 796 लोकांनी लाभ घेतलेला आहे.
500 युवकांना पर्यटन विकासाचे प्रशिक्षण
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत आता 1500 रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल.