नागपूर (Nagpur) : कन्हान नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाचा पर्याय म्हणून 50.63 कोटी रुपये खर्च करून नवीन पूल तयार करण्यात आला. परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते 1 सप्टेंबरला पुलाचे लोकार्पण झाले. पण या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असून आतील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पावसाला सुरूवात होताच पुलावरील स्लॅबचे सिमेंट निघून जागोजागी खड्डे पडायला प्रारंभ झाला. जेमतेम पावसाला सुरवात झाली आहे. पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन पुलाप्रमाणे नवीन पुलावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कन्हान पोलिस ठाण्याजवळील वळणावर मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोबतच हे खड्डा बीकेसीपी शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी धोक्याचा ठरत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. अनुचित घटना घडू नये म्हणून पुलावरील खड्डे तातडीने बुजवून वाळू व माती काढून टाकण्याची गरज आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
सहा महिन्यातच पुलाच्या मध्यभागी खड्डे
पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर सहा महिन्यातच पुलाच्या स्लॅबला मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले होते. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर माजी खासदार प्रकाश जाधव यांनी 'एनएनआय'चे अधिकारी बोरकर यांना ही बाब कळविली होती. बोरकर यांनी कनिष्ठ अधिकारी प्रकाश ठाकरे यांना कन्हान येथे पाहणीसाठी पाठविले होते. तसेच दहा दिवसांत दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला होता. त्यामुळे 'एनएनआय'चे थातूरमातूर डागडुजी केली होती. याचे परिणाम आता दिसत असून पुन्हा खड्डे तयार झाले आहेत.