potholes Tendernama
विदर्भ

ठेकेदाराच्या दुर्लक्षाने नागपूर-काटोल रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मध्यप्रदेश,अमरावतींना जोडणाऱ्या नागपूर-कळमेश्वर-काटोल या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालविताना चालकाचे हाडे खिळखिळे होत आहेत. दुसरीकडे खड्डे चुकविताना अपघात होत असून, हा रस्‍ता नसून मृत्यूचा सापळा असल्याची चर्चा आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी जुजबी काम केले. मात्र, तो पॅचवर्क उकडून खड्ड्यांचा आकार आणखी वाढत चालला आहे. रस्त्यांच्या मध्यभागात खोलवर खड्ड्यांसह अरुंद चरीमुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या किमान दहा ते पंधरा घटना दररोज घडत आहेत. ठेकेदाराकडून साधी मलमपट्टीही झाली नसल्याने अनेक वाहनचालकांच्या जिवावर हा महामार्ग उठला आहे.

नागपूर कळमेश्वर काटोल महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांनी अनेकदा निष्पापांचा बळी घेतला आहेत. तर अनेक जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. मात्र याचे साधे सोयरसुतक सुद्धा शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला राहिलेले नाही. महामार्गावर अजून किती जणांचा बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहात आहे का? असा सवाल वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. टोल नाका ते गोरेवाडा जंगलघाट ते फेटरी ते येरला,दहेगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा वाहनचालकांचा अपघातसुद्धा होत आहे. बांधकाम विभागाने या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हा तर मृत्यूचा सापळाच!
साक्षात मृत्यूचा सापळा ठरलेल्या या महामार्गावर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. २० किलो मीटरच्या या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येतात. त्याच अवस्थेतून वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागतो आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू
नागपूर-काटोल महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मागील वर्षीपासून सुरू असून हा महामार्ग बनायला आणखी बराच वेळ लागणार आहे. परंतु, या महामार्गावर बऱ्याच प्रमाणात मोठमोठे खड्डे पडलेले किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी वाहनचालकांकडून मागणी होत आहे.