Road Tendernama
विदर्भ

Bhandara : 'या' मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : भंडारा तालुक्यातील आंबाडीवरून सिल्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे आहेत, असा नागरिकांनी प्रशासनाला सवाल केला आहे.

भंडारालगतच्या आंबाडीवरून आंभोरा, सिल्ली, मानेगाव, झबाडा, बोरगाव, तिड्डी, मकरधोकडा, टेकेपार इत्यादी गावाला जोडणारा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावरून भंडारा ते आंभोरा अशी नागरिकांची रोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचे दैनंदिन कामे, सरकारी कामे, शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मजुरी करण्यासाठी स्वतःच्या दुचाकीने प्रवास करीत असणाऱ्या कामगारांना याच खड्डे पडलेल्या रस्त्यावरून रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो.

अंबाडी ते सिल्ली या अर्धा किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्यामध्ये पाणी भरले असते. त्यामुळे अनेकदा नागरिकांना खड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रोज या खड्ड्यांमध्ये प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.