Samruddhi Expressway Tendernama
विदर्भ

Chandrapur : 'समृद्धी'साठी 73 गावांत जमिनीचे होणार भूसंपादन; आल्या नोटीस

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजपासून दुर्ग हैदराबाद मार्गाला चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव मोरे येथे जोडणाऱ्या शीघ्र संचार द्रुतगती मार्गासाठी 73 गावांच्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे. रस्ते विकास महामंडळ व बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी मार्किंग केले. गेल्या आठवड्यात टेंडर जाहीर झाल्याने रस्त्यालगतच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहरातील बड्या मंडळींची चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यांत ये जा सुरु झाली आहे.

नागपूर ते मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे. या महामार्गाला अन्य मार्ग जोडण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकास महामंडळाच्या आराखड्यानुसार पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. याकरिता 73 गावांतील शेती या मार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. हे तालुके समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजपासून जोडले जातील. समृद्धीलाच जोडणारा घुग्घुस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ताही तयार होणार आहे. हा समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागेल. हा महामार्ग समृद्धीच्या तुलनेत आकाराने लहान आहे. शासनाने यासाठी निधीची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात काम सुरु होण्यास बरेच दिवस जातील. मात्र या महामार्गाने चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विश्वात मोठ्या उलाढाली होण्याचे संकेत आहेत. 

नागपूर ते चंद्रपूर 195 किमी अंतरावरील समृद्धी महामार्गाच्या बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सर्वाधिक 22 टेंडर आली आहेत. समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करताना काहींची संपूर्ण शेती, तर काहींच्या शेतीचा काही भाग जाणार आहे. मुख्य मार्ग तयार करताना शेतीकडे जाणारा रस्ता आणि मोबदल्याचे स्वरूप कसे राहणार, याबाबत राज्य शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही; परंतु अन्याय होईल, असा कोणताही नियम घाईने लागू न करता, शेतकऱ्यांचे म्हणणे आधी समजून घ्यावे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. 

'या' गावांत होणार भूसंपादन : 

भद्रावती, चोपन रिठ, गोटाळा रिठ, खंडाळा रिठ, कोंडा, कुरोडा, विजासन, कुनाड़ा टोला, चारगाव, लोणार रिठ. ढोरवासा, तेलवासा, पिपरी, घोनाड, मुरसा, बोरगाव रिठ गावातील शेती या मार्गात जाणार आहे. वरोरा तालुका, बोडखा, चक मकसूर, चक कवडापूर, सुमठाणा, मांडवगुहाड, बोरगाव, शिवणफळ, पांढरतळा, आसाळा, पाचगाव, पिजदूरा, बोरगाव देश, सालोरी, खातोडा, वलनी वनग्राम, परसोडा, जामगाव, जाम खुर्द. चंद्रपूर ,शेणगाव, पांढरकवडा, वढा, धानोरा, पिप्री, कोरपना,भोयेगाव, नांदगाव, कोराडी, नवेगाव, निमणी, राजुरा,वरोडा, हिरापूर, चिंचोळी, चिंचोळी खुर्द, अंतरगाव खु, गोवरी, माथरा, धोपटाळा, गडपडखामी, बामनवाडा, चुनाळा, बल्लारपूर, आष्टी, कळमना, जोगापूर, जेवरा, कोर्टीमक्ता, पळसगाव, किन्ही, कवडजई, पोंभुर्णा, चक घनोटी, चक घनोटी, घनोटी तुकूम, बोर्डा रिठ, कसरगट्टा, पोंभुर्णा, चक पोंभुर्णा, आष्टा, वेळवा चक, नवेगाव चक, चक खापरी, नवेगाव मोरे, चक ठाणेवासना, घाटकूळ या सर्व गावातील जमीन समृद्धि महामार्गात जाणार आहे.