कामठी, विदर्भ (Kamthi, Vidarbha) : कामठी नगरपरिषदेत 2023 - 2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आले. त्यात एकूण भांडवल खर्च 85 कोटी 97 लाख राहणार असून, यामध्ये प्रशासकीय इमारतीवर 15 कोटी, सौरऊर्जा प्रकल्पावर 1 कोटी, वाहतूक सिग्नलवर दीड कोटी, तर सांडपाणी प्रकल्पावर 5 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
महसुली खर्चातून 32 कोटी 61 लाख रुपयांचा आस्थापना खर्च होणार आहे. त्यामध्ये दलित वस्ती 7 कोटी, नागरी दलितोत्तर सुधार योजना 10 कोटी, नगरोत्थान महाअभियान 8 कोटी रुपयांचा समावेश राहणार आहे.
प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या सभेत लेखापाल अमित खंडेलवाल, धर्मेश जैस्वाल यांनी सादर केलेल्या 2023 - 2024 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार यावर्षी महसूल जमा हा 48 कोटी 82 लाख रुपये, तर भांडवली जमा हा 1 कोटी 3 लाख 41 हजार रुपये आहे. जमा महसुलामधून महसूल खर्च हा 47 कोटी 74 लाख रुपये, तसेच एकूण भांडवली जमामधून 89 कोटी 37 लाख रुपये खर्च होणार आहेत. यानुसार 2023 - 2024 या आर्थिक वर्षाचे शिल्लकी अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
2024-2024 च्या बजेट मध्ये कामठी तालुक्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांवर जोर दिला जाणार आहे. सांडपाणी प्रकल्प, दलित वस्ती, नागरी दलितोत्तर सुधार योजना, नगरोत्थान यावर मोठा निधी खर्च केला जाणार आहे. शहराला स्मार्ट सिटीमध्ये परिवर्तन करण्याची कामठी नगरपालिकेची कसरत सुरू आहे. नवीन प्रकल्प जरी हाथी घेतले असले तरी जुन्या प्रकल्पांची स्थिती काय झाली आहे, असा उलट सवाल नागरिक विचारत आहे. कारण कोट्यवधींचे मोठमोठे प्रकल्प आताही थंड बसत्यात गेले आहे.