Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

सरकार कोसळताच गडकरी फुटाळा तलावावर; काय घोषणा करणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : माजी ऊर्जामंत्री व मावळते पालकमंत्री नितीन राऊत सातत्याने विरोध करीत असलेल्या फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या पाहणीसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दौरा आखला आहे. हा योगायोग आहे की राऊतांनी विस्कटलेली घडी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आहे, हे सायंकाळच्या दौऱ्यानंतरच स्पष्ट होणार आहे. (Nitin Raut and Nitin Gadkari)

गडकरी यांनी नागपूरकरांच्या पर्यटनासाठी फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याजी योजना जाहीर केली होती. आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ करण्याचासाठी एका खास कंत्राटदाला कामही सोपवले होते. त्यानुसार आधीच्या फुटाळा चौपाटीवरचे सर्व बांधकाम पांडण्यात आले होते. बोटींगपासून तर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानुसार व्यावसायिक गाळेसुद्धा बांधले आहेत.

कामे अर्धवट असताना राज्यात महाविकास विकास आघाडीचे सरकार आले. पालकमंत्री नितीन राऊत यांना फुटाळा तलावासमोर बांधलेल्या भिंतीचे काम खटकले. या भिंतीमुळे तलावाचे नौसर्गिक सौंदर्य नष्ट झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. ही भिंत पाडण्याचा त्यांनी जंग बांधला होता. काही पत्रकारांना हाताशी धरून तशा बातम्यासुद्धा त्यांनी पेरल्या होत्या. त्यामुळे गडकरींचा प्रोजेक्ट रखडला होता. कंत्राटदारांचाही उत्साह मावळला होता. कामाची गती संथ झाली होती.

बुधवारी महाविकास आघाडी सरकार कोसळले. गुरुवारी शिंदे-फडणवीस युतीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे आपसूकच नितीन राऊत माजी पालकमंत्री झाले. लगेच गडकरी यांनी आज सायंकाळी फुटाळ तलाव पाहणी दौरा आयोजित केला आहे. सर्व वर्तमानपत्रांना फोन करून गडकरी यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली, तसेच प्रतिनिधी पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे गडकरी काही मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नितीन राऊत टक्केवारीसाठी कंत्राटदारांना त्रास देत होते. त्याकरिता फुटाळा तलावाच्या कामात हस्तक्षेप करीत होते. तांत्रिक चुका शोधून काम थांबवत होते, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. गडकरी यांचा प्रोजेक्ट असल्याने त्यांनी थेट फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाच्या बांधकामवर हस्तक्षेप घेतला नव्हता.