Jalyukt Shivar 2.0 Tendernama
विदर्भ

Amravati : जलयुक्त शिवारमध्ये निधीची कमतरता; आता पावसामुळे काम ठप्प

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : जलयुक्त शिवार टप्पा-2 मध्ये आतापर्यंत जलसंधारण विभागाने सुमारे 15 कोटींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, उर्वरित कामे निधी व मॉन्सूनमुळे अडकली. विशेष म्हणजे, या कामासाठी निधीसाठी वाट पाहावी लागत आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात 166 कामे पूर्ण झाल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे. 30 कोटी रुपयांपैकी प्राप्त झालेल्या 15 कोटी रुपयांतून ही कामे केली आहेत. अभिसरणाची 657 कामे आटोपली. जलयुक्त शिवार टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यासाठी 240 गावांत 470 कामांचा 30 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनची 30 कोटी रुपयांची 470 व अभिसरणाची 318 कोटी रुपये खर्चाच्या 4,239 कामांचा आराखडा तयार केला. यासाठी एकूण 348 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, जलयुक्तच्या कामांसाठी 15 कोटी व अभिसरणासाठी 140 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता.

जलयुक्तची कामे उन्हाळ्याच्या कालावधीत करता येतात. यंदा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टेंडर प्रक्रिया केल्यामुळे कामे करता आली. अद्याप जलयुक्तची 303 व अभिसरणाची 4,052 कामे अपूर्ण आहेत. सध्या मान्सूनला प्रारंभ झाला असल्याने पुन्हा ही कामे रखडण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय कामाची विभागणी : 

जलयुक्त शिवार योजनेतील सर्वाधिक 233 कामे भूजल सर्वेक्षण विभागाची असून, यापैकी 103 कामे झाली. कृषी विभागाकडील सातही कामे झाली. वनविभागाने मात्र 97 पैकी एकच काम पूर्ण केले. सर्व विभाग मिळून एकूण 166 कामे पूर्ण झाली आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याने या कामांची पूर्तता करता आली. जलयुक्त शिवारची कामामध्ये मृद व जलसंधारण 46 पैकी 12, जि. प. जलसंधारण 57 पैकी 24, जलसंपदा 29 पैकी 18, भूजल सर्वेक्षण 233 मधून 103, कृषी विभाग 7 पैकी 7, वनविभाग 97 पैकी 1 आणि सामाजिक वनीकरण 1 पैकी 1 याप्रमाणे कामे केली आहेत.