scam Tendernama
विदर्भ

Amravati : 'या' कार्यकारी अभियंताने टेंडर प्रक्रियेत केली मनमानी; मर्जीतील ठेकेदारासाठी टेंडर केले मॅनेज

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : तिवसा तालुक्यातील भिवापूर लघु प्रकल्पाचा सांडवा आणि कालव्याच्या दुरुस्तीसाठी महा ई-टेंडर संकेतस्थळावर तीन कोटींच्या कामांचे टेंडर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तीन वेळा उघडले. मात्र, या टेंडरमध्ये मर्जीतील कंत्राटदाराने टेंडर न भरल्याने ते टेंडर रद्ददेखील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.  या घोळ कारभाराची चौकशी करण्यासाठी पुराव्यासोबत तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे अमरावती पाटबंधारे विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के यांना 13 मे 2024 रोजी दिलेल्या तक्रारीत अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन प्रभारी अभियंता अनिकेत सावंत यांनी सूचना क्रमांक 06/2022-23 नुसार 3 कोटी 37 लाख रुपयांचे टेंडर शासनाच्या महा ई टेंडर वेबसाईट पोर्टलवर 21 नोव्हेबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. आणि 5 डिसेंबर 2022 ला हे टेंडर उघडले आणि 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. परंतु कार्यकारी अभियंता सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करून वरिष्ठांची परवानगी न घेता पोर्टलवरील टेंडर एक नव्हे, तर तीन वेळा उघडले तसेच कोणकोणत्या कंत्राटदाराने किती रक्कमेचे टेंडर भरले हे बघितले. विशेष म्हणजे त्यांच्या  मर्जीतील एकही कंत्राटदाराने टेंडर नाही भरले. म्हणून कोणतेही कारण नसताना काढलेले टेंडर रद्द केले आणि टेंडर रद्द केल्याचे पत्र अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविले. हा संपूर्ण प्रकार नियमाच्या विरुद्ध आहे.

पाटबंधारे खात्याची फसवणूक केल्याप्रकरणी या वादग्रस्त टेंडर प्रक्रियेची चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारीसह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर मागणी शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा या प्रकाराचा विरोध केला आहे. महा ई-टेंडरवर प्रसिद्ध टेंडर मध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. मात्र पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने तीन वेळा टेंडर ओपन करून नियमाचे उल्लघंन केले आहे. या प्रकरणात ऊर्ध्व पाटबंधारे विभाग, अमरावती चे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, ई-टेंडर उघडले गेले नाही, असे काहीही झालेले नाही. त्या वेळेस प्रणालीत बिघाड झाला होता. पण हे टेंडर उघडण्यापूर्वी रद्द करण्यात आले होते. मध्यंतरी सरकारचे अधिवेशन होते. त्यानंतर पुन्हा इस्टिमेट तयार करून मुख्य अधीक्षक अभियंत्यांच्या मंजुरीने कार्यवाही करण्यात आली.

दीड वर्षातील वर्क ऑर्डरची चौकशीची मागणी :

कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत हे अमरावती येथे ऊर्ध्व पाटबंधारे विभाग येथे कार्यरत आहे. त्यांच्याकडे वर्ष 2022 मध्ये अचलपूर कार्यालयाचा प्रभार होता. त्यांनी अनेक टेंडर मध्ये फिक्सिंग करून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील कंत्राटदारांना सर्वाधिक कंत्राट मॅनेज केले आहे. त्यामुळे गत दीड वर्षातील वर्क आर्डरची चौकशी केल्यास सत्यता उघडकीस येईल. तसेच 10 कोटींच्या विविध कामांच्या ई-टेंडर मध्ये ई.पी.एफ.ची अट वगळली, असे तक्रारीत म्हटले आहे.