Nagpur Tendernama
विदर्भ

दस्तनोंदणीच्या समाधानापेक्षा मनस्तापच जास्त; चिरिमिरीशिवाय...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण दस्तनोंदणी कार्यालयात येतात. दस्तनोंदणीनंतर घर आपल्या नावे होण्याचे समाधान असते. परंतु दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यावर समाधानापेक्षा मनस्ताप जास्त होत असल्याचा अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नागरिक त्रस्त आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालय सकाळी सुरू होताच अनेक जण हजर असतात. पण प्रत्येकाचे काम लवकर होत नाही. ज्यांची ‘सेटींग’ नाही अशांचे दस्त सर्व कागदपत्रे योग्य असल्यावरही लागत नाही. त्यात काहीतरी खोट काढून बाजूला ठेवण्यात येते किंवा कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली थोडावेळ थांबण्यास सांगितले जाते. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

जिल्हाधिकारी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास दस्त नोंदणीसाठी आलो. परंतु आपल्याला त्यासाठी खूप वेळ लागला. मागून आलेल्यांची दस्त नोंदणी माझ्या आधी झाली.

येथे दस्त नोंदणीसाठी कार्यालयात मोठी गर्दी होते, मात्र येथे कोणतीही फारशी चांगली सुविधा नाही. कार्यालयात जागा कमी असल्याने बाहेर उभे राहावे लागते. पाण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच अडचण होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह सक्करदरा, महाकाळकर सभागृह व सदर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जास्त दस्त लागतात. नागपूर शहरात ९ कार्यालये असून, ४ शासकीय तर ५ खासगी इमारतीत आहे. एका कार्यालयात जवळपास २० ते २५ दस्त लागतात.

ग्रामीण भागात मनमानी कारभार

ग्रामीण भागातही मोठा भोंगळ कारभार आहे. कळमेश्वर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी येणारे शेतकरी, ले-आउट मालक व इतर नागरिकांच्याही तक्रारी आहेत. दस्त नोंदणीसाठी पैशाची मागणी होत असून, वागणूकही योग्य मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. शासनाने तुकडेबंदी कायदा लागू केला आहे, तसेच रेरा कायदा लागू झाल्यानंतरही या दोन्ही कायद्याचे सर्रास उल्लघन करून बोगस दस्त नोंदणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. दुय्यम निबंधक एजंट मार्फत पैसे घेऊन त्या कागदपत्रांची दस्त नोंदणी करून घेतात. या मनमानी कारभाराचा बार असोसिशन कळमेश्वर यांनी निषेध करत सहजिल्हा निबंधक नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्यांची बदली न कल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अनेक कार्यालयात असाच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

काही कार्यालयात व्यवस्थेचा अभाव असेल. त्यामुळे तिथे आवश्यक सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. दुय्यक निबंधकांबाबत असलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात येईल.

- राजेश राऊत, विभागीय नोंदणी महानिरीक्षक, नागपूर विभाग