coal mine Tendernama
विदर्भ

कोळसा टंचाईचा उद्योगांनाही फटका; खुल्या बाजारात कोळशाचे दर...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भातील उद्योगांपुढे कोळश्याअभावी मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील उद्योगांना १५ ते २० टक्के फटका बसत आहे. सरकारने तातडीने सर्व कोळसा वीज केंद्रांकडे वळता केला आणि हे संकट टळले. मात्र आता राज्यातील उद्योगांपुढे मोठ संकट निर्माण झाले आहे.

सध्या राज्यातील सर्व कोळसा हा वीज निर्मितीसाठी प्राधान्याने दिल्या जात आहे. यामुळे लघु व मध्यम उद्योगांपुढे मोठ संकट निर्माण झाले आहे. मध्य भारतात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ही सरकारी कोळसा कंपनी कोळसा उत्खननाचे काम करते. डब्ल्यूसीएलच्या एकूण उत्पादनापैकी ९२ टक्के कोळसा हा वीज कंपन्यांना, तर ८ टक्के हा उद्योगांना दिला जातो; मात्र सध्या उत्पादनात घट आल्यामुळे विदर्भातील उद्योगांना कोळसा मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले.
तर दुसरीकडे डब्ल्यूसीएलचा कोळसा उपलब्ध होत नसल्याने या उद्योगांना खुल्या बाजारातून कोळसा विकत घ्यावा लागतोय. टंचाईमुळे खुल्या बाजारात कोळशाचे भाव सात हजार रुपये टनवरून १३ ते १४ हजारापर्यंत गेले आहेत. सोबतच कोळशात भेसळ देखील होत आहे. कोळश्याच्या या संकटामुळे विदर्भातील ३५० पेक्षा अधिक छोटे-मध्यम आणि ३० ते ३५ मोठया उद्योगांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

स्टील, पेपर, केमिकल, सिमेंट या सारख्या उद्योगांना फर्नेस आणि बॉईलरसाठी कोळशाची गरज असते, मात्र राज्य आणि केंद्र सरकारने यावर तातडीने उपाय न काढल्यास उद्योगांपुढे मोठ संकट उभे ठाकले आहे, अशी माहिती बीएमएचे माजी अध्यक्ष नितीन लोणकर यांनी दिली. कोळशाचे संकट आधी वीज निर्मितीच्या मुळावर उठले होते. मात्र कोळसा आधारित शेकडो उद्योग यामुळे प्रभावित झाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. परिणामी, आगामी काळात मोठ्या उद्योगांना सहाय्यभूत ठरणारे लघु उद्योग किती काळ तग धरतील, अशी भीती निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांनी कॅप्टिव पॉवर प्लॅन्ट क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती करीत आहे. काही कंपन्यांनी जनरेटरचा वापर करू उत्पादन सुरु ठेवले आहे.