नागपूर (Nagpur) : अमरावती ते अकोला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७.३४ किमीचा दुपदरी (म्हणजेच ३४.७४ किमी एकपदरी) अखंड डांबरीकरण रस्ता ४८ तासांत पूर्ण केला आहे. या रस्त्याच्या बांधकामाची गती पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीच्या चमुला विश्वविक्रमासाठी ट्विट करून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५३ या विभागात सिंगल लेन ७५ किमी अखंड डांबरीकरणाचा महामार्ग बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. १७.३४ किमी (२ लेन पेव्हड शोल्डर) दुपदरी म्हणजे ३७.७४ किमी एक पदरी अखंड डांबरीकरण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराची चमूने ४८ तासांत टाकला आहे.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असून, कामाच्या सर्व क्रिया प्रक्रियांची नोंद घेत आहेत. गडकरी म्हणाले, मला गुणवत्ता अहवाल प्राप्त झाला आहे. रस्ता बांधकामाचे प्रमाण व अन्य मापदंड पाहता संपूर्ण देशाला आनंद व अभिमान वाटेल अशा विश्वविक्रमाचा समावेश या कामाचा होईल.
रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा ही उभारलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे बांधकाम साहित्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NHAI) निर्धारित दर्जाप्रमाणेच काम केले जाणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत आहेत. रस्तानिर्माण कामाच्या प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअरसह इतरांचे चमू तैनात आहेत. माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. त्यात ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्री कार्यरत आहे. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी तैनात आहेत. हे चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहेत.
सतत ११० तास रात्रंदिवस काम करून पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पातील कामाची गुणवत्ता निरंतर तपासली जाईल. कामाचे मायक्रो प्लॅनिंग झाले असून, पूर्णत्वास गेल्यानंतर हा देशातील असा पहिला प्रकल्प असेल.
- राजीव अग्रवाल, क्षेत्रीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण