नागपूर (Nagpur) : नागपुरात बांधकाम क्षेत्राचा नेटवर्क टप्पा वाढत असून प्रकल्पांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्याचप्रमाणे महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत दरवर्षी 10 टक्के वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच विदर्भात 447 तर एकट्या नागपुरात 336 बांधकाम प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी झाली आहे.
नागपुरात घरांच्या विक्रीसह मोठ्या कंपन्यांच्या बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू आहे. सध्या नागपुरात 336 प्रकल्पांची नोंद झाली असली तरीही याआधी हा आकडा 170 ते 200 च्या आसपास असायचा.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर आघाडीवर :
राज्यातील काही जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर बांधकाम क्षेत्रात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकहून पुढे आहे. नागपूरच्या आसपास केवळ नाशिक आहे. यावरून नागपूरचे बांधकाम क्षेत्र पुणे आणि मुंबईप्रमाणेच संघटित होताना दिसत आहे.
विदर्भात नागपूर पुढेच :
बांधकाम क्षेत्रात नागपूर विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या तुलनेत विकासात पुढेच आहे. अन्य जिल्ह्यात बिल्डरांचे व्यक्त्तिगत घरांवर लक्ष्य असल्याने बिल्डरांचे प्रकल्प कमी प्रमाणात येत आहेत.
राज्यात वर्षभरात 4,332 प्रकल्पांची नोंदणी :
महाराष्ट्रात महारेराकडे नोंदणीसाठी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 5,471 नवीन प्रस्ताव आले होते. यामध्ये 4.332 नवीन प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिला. विदर्भात 447, उत्तर महाराष्ट्रात 347, नाशिकमध्ये 310 आणि मराठवाड्यात 149 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाला. नागपुरात घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार प्रकल्पांची संख्याही वाढली आहे. सध्या नागपुरात 500 चौ. मीटरवरील एक हजाराहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. विकासासोबत दरवर्षी 10 टक्के मागणी चावत आहे. महामेट्रोचे दुसऱ्या आणि तिसया टप्प्याच्या पूर्णत्वानंतर नोंदणी संख्या दुप्पट, तिपटीवर जाईल. अशी माहिती प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो यांनी दिली.
बिल्डरांच्या जाहिरातीमधील अनियमितता शोधून त्यांना शो कॉज नोटिसा देणे, व्हर्चुअल सुनावणी घेऊन निरसन आणि विदर्भ व मराठवाड्यातील ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याचे काम आहे. महारेराकडे नागपूरसह विदर्भातील बांधकाम प्रकल्पांची नोंदणी वाढली आहे. नागपूरच्या विकासासोबतच बांधकाम प्रकल्पांची संख्याही वाढेल. अशी माहिती संजय भीमनवार, उपसचिव, महारेरा (विदर्भ व मराठवाडा) यांनी दिली.