Nagpur News नागपूर : हल्दीराम (Haldiram) हा 87 वर्षे जुना ब्रँड आहे. हल्दीराम संपूर्ण भारतात नव्हे तर विदेशात सुद्धा घराघरात लोकप्रिय आहे. हल्दीरामचे नमकीन भुजिया, स्नॅक्स आणि अन्य फूड प्रोडक्ट्स ला मोठी मागणी आहे. 87 वर्षे पूर्ण झालेली ही कंपनी आता विकली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या कंपनी सोबत होऊ शकतो करार
अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि जीआयसी सिंगापूरसह जगातील सर्वात मोठी खाजगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन यांच्या नेतृत्वाखालील एक कंन्सोर्टियम हल्दीराममधील कंट्रोलिंग स्टेक विकत घेऊ इच्छित आहे. गेल्या आठवड्यात कन्सोर्टियमने हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेडमधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी नॉन-बाइंडिंग बोली सादर केली होती.
ब्लॅकस्टोन आणि त्याच्या भागीदारांना हल्दीराममधील 74 ते 76 टक्के हिस्सा खरेदी करण्यात रस आहे. त्याने त्याचे मूल्य 8 ते 8.5 अब्ज डॉलर्स (66,400-70,500 कोटी) ठेवले आहे. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि जीआयसी दोघेही ब्लॅकस्टोनच्या जागतिक निधीचे मर्यादित भागीदार आहेत. हा करार सर्वात मोठा असण्याची शक्यता आहे.
हल्दीराम परिवाराने पॅक फूड बिझनेस आणि रेस्टॉरंट बिझनेस दोन गटांमध्ये वाटणी केली होती. मनोहर अग्रवाल-मधुसूदन अग्रवाल या दिल्ली गटाच्या परिवाराकडे हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेटचा 56 टक्के हिस्सा आहे. कमलकुमार शिवकिसन अग्रवाल या नागपूरच्या गटाकडे 44 टक्के हिस्सेदारी आहे. हल्दीराम हा अग्रवाल कुटुंबाच्या दिल्ली आणि नागपूर अशा दोन गटातर्फे चालवला जाणारा पॅकेज स्नॅक्स आणि फूड व्यवसाय आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात के. के. चुटानी यांची हल्दीरामच्या सीईओपदी नियुक्ती झाली. के. के. चुटानी हे डाबर इंटरनॅशनलचे माजी सीईओ आहेत. पहिल्यांदाच एखाद्या व्यावसायिक व्यक्तीची निवड कपंपनीने केली होती. आता हल्दीराम विकली जाणार म्हणून देशात चर्चेला उधान आले आहे.