चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 109 अन्वये गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात इरादापत्र मिळण्याबाबतचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी शिफारस केली होती. प्रस्तावांना मान्यता मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दोन व गडचिरोली जिल्ह्यात तीन असे एकूण पाच महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गडचिरोली येथे 2 ऑक्टोबर 2011 रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सद्यस्थितीत 113 महाविद्यालये संलग्नित आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 109 आणि संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार, 2024-25 या सत्रात नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाने इरादापत्र मिळण्याबाबतचे पाच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. विद्यापीठांकडून प्राप्त प्रस्तावांची निकषांनुसार तपासणी करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 109 (3) (घ) नुसार शासनास असलेल्या अधिकारात नवीन पाच महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कायम विनाअनुदान तत्वावर इरादापत्र मंजूर करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत
महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत इरादापत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत. अशाप्रकारे प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्यास यासंदर्भातील कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व इरादापत्र रद्द करण्यात येईल. सोयीसुविधा उपलब्ध करताना दिव्यांग विद्याथ्यांच्या सोयी-सुविधांची खातरजमा करावी. अंतिम मान्यतेचा पूर्तता अहवाल सादर करताना या संदर्भातील प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अंतिम मान्यतेनंतरच संलग्नतेची प्रक्रिया :
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 109 (3) (च) अंतर्गत परंतुकी नमूद केल्याप्रमाणे खंड (ड) मध्ये नमूद केलेल्या कालमर्यादित व्यवस्थापन इरादापत्रातील शर्तीचे अनुपालन करण्यात कसूर झाल्यास मंजूर इरादापत्र रद्द केल्या जाईल. महाविद्यालयाला अंतिम मान्यता प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरू करू नये, अशा सूचनाही आहे.
पाच महाविद्यालय कुठे असणार?
आशा बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरद्वारे चिमूर तालुक्यातील बोडधा येथे आशा महिला महाविद्यालय, ग्रामीण बहुउद्देशीय लोक शिक्षण संस्था वंधलीद्वारे वरोरा तालुक्यातील वेधली येथे बाबा आमटे वरिष्ठ महाविद्यालय, यशोदीप संस्था गडचिरोलीद्वारे यशोदाबाई हरडे महिला महाविद्यालय चामोशीं, सोसायटी ऑफ सोशल एकॉनामिक अॅण्ड डेव्हलपमेंट गडचिरोलीद्वारे स्वामी विवेकानंद सायन्स नाईट कॉलेज गडचिरोली, न्यू एज्युकेशन बहुउद्देशीय संस्था घोटद्वारा धानोरा येथे पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय 2024-25 या सत्रात सुरू होणार आहे.