RTMNU Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : इनडोअर क्रीडा संकुलासाठी विद्यापीठाला 20 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रविनगर चौकात असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात प्रस्तावित जागतिक दर्जाच्या बहु-क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून 20 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला. निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या विद्यापीठ क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात आहे. ट्रॅक तयार झाल्यानंतर क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार असल्याचे समजते. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निधी वाटपाबाबत सरकारी आदेश जारी केला.

नागपूर विद्यापीठ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून या प्रकारच्या बांधकामामुळे नागपूर विद्यापीठ आणि उपराजधानीतील क्रीडा प्रतिभांना निश्चितच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. 13 मार्च 2023 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार या क्रीडा संकुलासाठी 44.41 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

प्रशासकीय मान्यतेनुसार 20 कोटी रुपयांची पहिला टप्पा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे बहु क्रीडा संकुल केवळ नागपूर शहरातीलच नव्हे तर मध्य भारतातील खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देईल. त्यामुळे विद्यापीठासह येथील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचा लाभ घेता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 रोजी झाली. विद्यापीठाचा परिसर 373 एकरमध्ये पसरलेला आहे.

मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या या विद्यापीठाने शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे 2022-23 हे शैक्षणिक वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने विद्यापीठाच्या एकात्मिक ज्ञाननिर्मिती आणि कौशल्यनिर्मिती बरोबरच आजूबाजूच्या लोकसंख्येच्या भौतिक गरजाही विचारात घेण्यात आल्या आहेत. यासोबतच भविष्यातील विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठाने काही नवीन प्रकल्पांची उभारणी सुरू केली. त्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.