वर्धा (Wardha) : शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठी वर्दळ असल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. काहींना जीवही गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला होता. या घटनेने आर्वीकरांमध्ये रोष होता. याची दखल घेत उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव सुमित वानखेडे यांनी 6 डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आर्वीतील वाहतूक व्यवस्थेची संपूर्ण माहिती देत नव्याने बायपास रस्ता करण्याची मागणी केली. मागणीचे फलस्वरूप आर्वी शहरात बायपास रस्ता निर्माणासाठी प्रशासकीय मान्यता देत त्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी 27 कोटी रुपये निर्गमित करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांच्या रोषाला पाहता न.प. ने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही कारवाई नियमबाह्य होती. यात अनेक स्थायी, अस्थायी छोट्या, मोठ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. अखेर सुमित वानखेडे यांनी अतिक्रमण मोहीम बंद पाडली. अतिक्रमण हटलेच पाहिजे. परंतु ते नियमानुसारच ही आग्रही भूमिका सुमित वानखेडे यांनी घेत जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण नियमानुसार हटविण्यासाठी निवेदन शहरात दिले.
वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत शहराबाहेर बायपास रस्ता केल्यास अपघातात घट होईल, हे लक्षात घेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना शहराबाहेरून बायपास रस्ता देण्याची विनंती केली, अखेर त्यांच्या मागणीला यश आले. वानखेडे यांच्या पुढाकाराने तळेगाव येथील तीनशे खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय, आर्वी शहराबाहेरून जात असलेल्या बायपासकरिता 27 कोटी रुपये मंजूर करणे, नुकसानाचा मोबदला मिळवून देणे, विविध गावातील विकास कामांकरिता कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबाबत त्यांचे जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत, पुरुषोत्तम नागपुरे, बाळा सोनटक्के, प्रा. दर्शन चांभारे, राजू हिवसे, प्रज्वल कांडलकर, मनीष उभाड, हनुमंत चरडे, देवेंद्र इखार, नितीन अरबट, मोरेश्वर पुरी, संजय पोहेकर, बढीये यांनी आभार मानले.