road Tendernama
विदर्भ

Wardha : 32 कोटीत बनणार अंडरपास रस्ता; बांधकामाला सुरवात

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून शहरात होणाऱ्या 32 कोटी रुपयांच्या अंडरपास सिमेंट रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाली बांधकामाला गती देत कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

संबंधित सिमेंट रस्त्याची तसेच नाली बांधकामाची रुंदी 13 मीटर राहणार आहे. यामध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम 10 मीटर रुंदीचे तसेच रस्त्याच्या आजूबाजूला प्रत्येकी दीड मीटर याप्रमाणे तीन मीटरमध्ये नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. सोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत दिव्यांची व्यवस्था करून सौंदर्यात भर टाकली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने देवळी शहरातील अंडरपास सिमेंट रस्त्याचे पावणेचार किमी अंतरात बांधकाम करण्यात येणार आहे. वर्धा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बाजूने संबंधित रस्ता बांधकामाची सुरुवात करण्यात येणार आहे. सोबतच या रस्त्याचे बांधकाम देवळी रस्त्यावरील विश्रामगृह, पुलगाव चौक, बसस्थानक ते यवतमाळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्मशानभूमीच्या बोगद्यापर्यंत जाऊन पूर्णत्वास येणार आहे. 

या कंपनीला मिळाले टेंडर : 

रस्ता बांधकामाचे टेंडर मनसर येथील सनराईज कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. याचे काम प्रोजेक्ट मॅनेजर योगेश कुबडे हे सांभाळत आहेत. कंपनीने बांधकामाचे टेंडर अंदाजपत्रकीय किमतीच्या कमी दराने घेतले असल्याने कामाची गुणवत्ता महत्त्वाची ठरली आहे. रस्त्याच्या एका बाजूने काँक्रीट नाली बांधकामाला सुरुवात झाली असून, अर्धा किमी अंतरापर्यंतचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

कामाचा दर्जा जोपासण्याची गरज : 

उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याचे बांधकाम होत असल्याने बांधकामावरील पाण्याचा वापर कमी ठरत आहे. पाण्याचे क्युरिंग अत्यल्प ठरत आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने बांधकामाची तांत्रिक बाजू तसेच गुणवत्तेची तपासणी दुर्लक्षित ठरत असल्याची ओरड आता नागरिकांतून होत आहे. रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर देवळी शहराचे सौंदर्याकरण अवलंबुन असल्याने महामार्ग प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्ता कामाचा दर्जा जोपासावा, अशी मागणी देखील नागरिक करीत आहे.