Amravati Tendernama
विदर्भ

Amravati : 32 कोटीत शाळा, अंगणवाडी, रस्ते आणि तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना बहुप्रतीक्षेनंतर सन 2023- 24 या आर्थिक वर्षाच्या विकासकामांसाठी सुमारे 32 कोटी 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासाची कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग सीईओ अतिरिक्त सीईओ यांच्या मार्गदर्शनात सन 2023-24 या आर्थिक वर्षातील विविध विभागांच्या विकासकामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केला होता. अशातच अनेक दिवस जिल्हा नियोजन समितीची बैठकही विविध कारणांमुळे होऊ शकली नव्हती. अखेर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषद बांधकाम, महिला व बालकल्याण, शिक्षण विभागाकडून विविध कामांसाठीच्या निधी मागणीचा सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली.

यानंतर 2023-24 या आर्थिक वर्षांत बहुप्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेला सुमारे 32 कोटी 55 लाख रुपयांचा निधी 30 जानेवारी रोजी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, 50-54 इतर जिल्हा मार्ग, 30-53 ग्रामीण मार्ग, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम आदी कामांसाठी हा निधी मिळालेला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील बांधकाम, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, दुरुस्तीची कामे मार्गी लागणार आहे. जिल्हा परिषदेला 2023-24 या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे 32.55 कोटींचा निधी जानेवारीला प्राप्त झाला आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच संबंधित विभागाच्या समन्वयातून विकासकामे करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चे कार्यकारी अभियंता  दिनेश गायकवाड यांनी दिली.