Nag River Tendernama
विदर्भ

Nagpur : 2 हजार कोटीच्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला मिळणार गती

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरामध्ये वर्ष 2023 सप्टेंबर महिन्यात ओढावलेल्या पूर परिस्थितीसाठी प्रमुख कारण ठरणाऱ्या संपूर्ण नाग नदीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले. याच आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी युद्धपातळीवर मनपा प्रशासना तर्फे काम सुरु आहे.

काम करण्यासाठी या कंपन्या आल्या समोर : 

नागपुरातील नाग नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. सुमारे 2000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा उद्देश नाल्यात बदललेल्या नाग नदीचे स्वच्छ आणि पुनरुज्जीवन करणे हा आहे. टेंडर सादर केलेल्या दोन कंपन्यांपैकी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग लिमिटेडचा दावा अधिक मजबूत आहे. महापालिकेच्या तांत्रिक मूल्यमापन समितीच्या मार्किंगमध्ये टाटा कन्सल्टिंगला जास्त गुण मिळाले असले तरी कंपनीने भरलेले कोटेशनही इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती मिळताना दिसत आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाग नदीचे सध्या नाल्याचे स्वरूप आले असून, तिचे खऱ्या अर्थाने नदीत रूपांतर या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नागपूर महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढली होती. यामध्ये टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुडगावची कंपनी स्मेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी टेंडर भरले आहेत. महापालिका आयुक्त म्हणाले की, सध्या ज्या कंपन्यांनी राष्ट्रीय नदी संवर्धन मंडळाकडे पाठवले जाणार आहे, त्या प्रस्तावांचे आर्थिक मूल्यमापन महापालिकेने केले. समितीने टाटाला 93.77 टक्के तर स्मेकला 78.69 टक्के गुण दिले आहेत. टाटाने प्रकल्पासाठी 87 कोटी 12 लाख रुपयांची मागणी केली आहे. स्मेकने 104 कोटींहून अधिक किंमतीचे टेंडर भरले आहे. लवकरच कोणाला हे टेंडर मिळाले हे स्पष्ट होईल. लोकसभा निवडणूकीमुळे लागलेल्या आचारसहिते मुळे थोडी वाट बघावी लागू शकते.