Mayo Hospital Nagpur (IGGMCH) Tendernama
विदर्भ

Nagpur : शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आता वाढणार व्हेंटिलेटरची संख्या; 19 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. बालरोग विभाग लवकरच हायटेक होणार आहे. याअंतर्गत बालरोग अतिदक्षता विभागाचे नूतनीकरण करीत अत्याधुनिक उपकरणेही उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सरकारने या विभागासाठी स्वतंत्र 18 कोटी 90 रुपये मंजूर केले आहेत.

बालरोग क्षेत्रात आधुनिक उपचार पद्धती आल्याने उपचारचा प्रोटोकॉलही बदलला आहे. त्यामुळे डॉक्टरांना उपचार सोपे झाले असून रुग्णांचाही लवकर प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी मेडिकलच्या बालरोग विभागाचे वॉर्ड क्रमांक 3, 5 आणि 6 असे विभाग होते. यात जेमतेम 30 खाटांचा आयसीयू सेवेत होता. आयसीयूमध्ये जागेअभावी मेडिकलव्यतिरिक्त मेयोमधून रेफर केलेले बालरुग्णही दाखल होतात. एखाद्या रुग्णाला इतर हॉस्पिटलमधून रेफर केले तर त्याला दाखल करता येत नव्हते. तो गंभीर रुग्ण असताना त्याला जनरल वॉर्डमध्ये दाखल करून उपचार केले जाते. त्यामुळे मेडिकलचा आयसीयू कायम हाऊसफूल असतो. 

नंतर अतिदक्षता विभागाची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रिया विभाग, औषधनिर्माणशास्त्र विभाग आणि बालरोग विभाग आयसीयूत खाटाही वाढविण्यात आल्या. सध्या बालरुग्णांसाठी 20. खाटांचे पी.आय.सी.यू. आणि मुलांसाठी 65 खाटांचे एन.आय.सी. यू. सेवेत उपलब्ध आहेत. या आयसीयूमध्ये, मेडिकलमध्ये जन्मलेल्या 40 मुलांसाठी आणि इतर हॉस्पिटलमधून रेफर केलेल्या 25 मुलांसाठी बेड ठेवण्यात आले आहेत. हे बेडही फुल्ल असतात. एन.आय.सी.यू. मध्ये व्हेंटिलेटरची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे. मात्र आता अपग्रेडेशनसाठी निधी मिळाल्यानंतर 20 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज नाही, पण ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांसाठी 'हाय-फ्लो नासल कॅन्युला' उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. मॉनिटर सिस्टीम, एबीजी डिव्हाईस, इको मशीनही उपलब्ध असेल. यामुळे उपचारासाठी थांबावे लागणार नाही.