Sports Complex Tendernama
विदर्भ

Yavatmal : खेळाडूंसाठी गुड न्यूज; 'या' क्रीडा संकुलासाठी मिळाले 10 कोटी

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : जिल्ह्यातील झरीजामणी, मारेगाव या तालुक्यांना हक्काचे तालुका क्रीडा संकुल मिळणार आहे. राज्य सरकारने राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील झरीजामणी व मारेगाव या दोन नवीन तालुका क्रीडा संकुलांच्या उभारणीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी राज्य शासन अनुदान देत असते. 2009 च्या शासन निर्णयानुसार पूर्वी हे अनुदान एक कोटी रुपये होते. मार्च 2022 मध्ये अनुदानात वाढ होऊन ती तब्बल पाच कोटी रुपये इतकी करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने एप्रिल 2023 मध्ये मारेगाव येथे तालुका क्रीडा संकुलासाठी टाकरखेडा गट क्रमांक 33 येथे पाच एकर जागा सरकारकडून प्राप्त केली. 

आता येथे 400 मीटर रनिंग ट्रॅक

सिमेंट रोड, बहुउद्देशीय हॉल, कार्यालय इमारत, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल इत्यादी विविध खेळांचे क्रीडांगणे, बास्केटबॉलचे स्वतंत्र क्रीडांगण, संकुलाला संपूर्ण संरक्षण भिंत यासाठी एकूण 5 कोटी 87 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. झरीजामणी तालुक्यात पाटण येथील गट क्रमांक 106 यातील दोन हेक्टर जमीन तालुका क्रीडा संकुलसाठी जागा मिळाली आहे. जून 2022 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ही जागा रितसर ताब्यात घेतली. या जागेवर पाच कोटी रुपयांच्या अनुदानातून 400 मीटरचा रनिंग ट्रॅक, सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रोड, संरक्षण भिंत, कार्यालय इमारत, बॉक्सिंग हॉल, जुडो हॉल, कराटे, योगा, जिम, चेंजिंग रूम, कबड्डी, खो- खो, हॉलीबॉलची क्रीडांगणे, बास्केट बॉल ग्राउंड उभारले जाणार आहे. झरीजामणी आणि मारेगाव येथे तालुका क्रीडा संकुलसाठी अनेक वर्षांपासून जागा मिळाली नव्हती, आता मात्र शासनाला हक्काची जागा मिळाली आहे. संकुल उभारणीसाठी प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यतादेखील मिळाली आहे. निधी प्राप्त होताच निविदा प्रक्रिया राबवून दोन्ही तालुक्यांत सर्व सोयींनी युक्त तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न राहील. आणि लवकरच कामा संदर्भात टेंडर काढले जातील अशी माहिती यवतमाळ चे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली.

ग्रामीण खेळाडूंना मिळणार हक्काचे संकूल : 

ग्रामीण भागातील तरुणांना आपले क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी फारशी संधी मिळत नाही. बरेचदा साधनांचा अभाव असतो. आता त्यांना हक्काचे क्रीडा संकूल उपलब्ध होणार आहे.