Indian Railways Tendernama
विदर्भ

Gondia : तिसऱ्या रेल्वेलाईनचे काम लवकर होणार पूर्ण; 3425 कोटींची तरतूद

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : नागपूर-राजनांदगाव रेल्वे मार्गावरील तिसऱ्या लाइनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, 228 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्या वेळेत धावण्यास मदत होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेग वाढणार असून वेळेची बचत होऊन प्रवास सुखकर होणार आहे.

हावडा-मुंबई मार्गावरील नागपूर ते बिलासपूरदरम्यान मालगाड्यांची सर्वाधिक वर्दळ असते. सध्या दोनच लाइन असल्याने मालगाड्या सोडण्यासाठी प्रवासी गाड्यांना थांबवून ठेवले जाते. परिणामी प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बिघडत असल्याने त्याचा प्रवाशांना फटका बसतो. अश्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने नागपूर- राजनांदगाव दरम्यान तिसऱ्या लाइनचे काम सुरू केले आहे. एकूण 228 किमीची ही तिसरी लाइन असून यापैकी 180 किमीचे काम पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सध्या रेल्वे विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कार्याअंतर्गत दुर्ग-कळमना तिसरा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर अधिकाधिक रेल्वे गाड्या चालविणे शक्य होणार आहे. प्रवासी रेल्वे सेवेत वाढ होण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सुरळीत व सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच रेल्वे गाड्यांचा वेगही वाढणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

गाड्यांचा वेगही वाढणार : 

तिसऱ्या लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची गतीसुद्धा वाढणार आहे. सध्या रेल्वे मार्गावरून 130 ते 140 किमीच्या वेगाने गाड्या धावत आहे. तर या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर 180 किमीच्या वेगाने रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे कमी वेळेत अधिक अंतर गाठणे शक्य होणार असून या मार्गावरील प्रवासदेखील सुखकर होणार आहे.

मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांमधील अडचण होईल दूर : 

सध्या या मार्गावर धावणाऱ्या मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अडचण होत आहे. मात्र तिसऱ्या लाइन काम पूर्ण झाल्यानंतर मालगाड्यांचा अडथळा दूर होणार आहे. तर प्रवासी गाड्यासुद्धा नियोजित वेळेत धावणार आहेत.

तिसऱ्या लाइनसाठी 3425 कोटी रुपयांची तरतूद : 

दुर्ग ते कळमनादरम्यान तिसऱ्या लाइनच्या कामासाठी रेल्वे विभागाने 3425 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. राजनांदगाव-नागपूर या एकूण 228 किमी मार्गापैकी 180 किमीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. दरेकसा-सालेकसा हा 10 किमीचा मार्ग वगळता उर्वरित तिसरी लाइनचे काम झाले आहे. तर सालेकसा-धानोली 7 किमी, गुदमा-गंगाझरी 24 किमी आणि कामठी-कळमना 7 किमी या एकूण 38 किमीच्या कामाला वन विभागा- कडून मंजुरी मिळाली आहे. 2024-25 हे काम पूर्ण करण्याचे लक्ष रेल्वे विभागाने निर्धारित केले आहे.