Road Tendernama
विदर्भ

'या' जिल्ह्यातील 600 रस्ते बांधकामांना मंजुरी मिळूनही का रखडली कामे?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. अनेकांच्या शेतात जाण्यासाठी सुविधाच नसल्याने काटे, गोटे, चिखल तुडवत शेतशिवार गाठावे लागते. खरीप हंगाम तोंडावर आला असताना पाणंद रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या हंगामातही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यात 824 पाणंद रस्ते मंजूर आहेत. मात्र दुसरीकडे 600 पाणंद रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. पाणंद रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात बी-बियाणे, खते, शेती साहित्य नेताना तारेवरची कसरत करावी लागते. शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अशा शेतकऱ्यांना  मजूरही मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे  गणित अवलंबून असते. हंगाम खाली जाऊ नये म्हणून शेतकरी डोक्यावर ओझे वाहून नेतात. तीच परिस्थिती - शेतातून शेतमाल निघाल्यावरदेखील असते. शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून बैलबंडी टाकल्यास वादाचे  प्रसंगदेखील उ‌द्भवल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होते.

तालुकास्तरावरून  जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणंद रस्त्यासाठी प्रस्ताव पाठविले जातात. 2023-24 या वर्षासाठी एकूण 824 मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. यात सर्वाधिक उमरखेड 154, दारव्हा 81 आणि यवतमाळ 75 अशी तालुकास्तरीय कामांची एकूण संख्या आहे. 499 कामांना तांत्रिक व 453 कामांना प्रशासकीय मान्यता  देण्यात आली. 375 कामांना कार्यारंभ आदेश दिल्यावर 242 कामांना प्रारंभ झाला. यात ग्रामपंचायत यंत्रणेच्या 188, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या 45 आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 9 कामांचा समावेश आहे. मात्र, अजूनही कामे पूर्णत्वास आलेली नाहीत. एक किलोमीटरच्या एका रस्त्यासाठी 25 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आता शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग वाढली आहे. मात्र, पाणंद रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आता शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग वाढली आहे. मात्र, पाणंद रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दिग्रस विधानसभा क्षेत्रात किती ?

जिल्हा नियोजन समितीमधून 79 पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. हे सर्व पाणंद रस्ते पालकमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा क्षेत्रातील आहेत. 79 पैकी 71 रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली. नेर तालुक्यात 26, दारव्हा तालुक्यात 26 आणि दिग्रस तालुक्यातील 27 पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. त्यापैकी नेरमध्ये 24, दारव्यात 24, दिग्रस तालुक्यात 24 कामांना सुरुवात झाली. यासाठी 5 कोटी 51 लाख 98 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हाभरात पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीमधून पाणंद रस्ते देताना केवळ मतदारसंघातील दारव्हा, दिग्रस, नेर या तीनच तालुक्यावर फोकस करण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. उमरखेड, दारव्हा, नेर, या तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू आहेत. तर महागाव, मारेगाव, वणी, घाटंजी, झरी, राळेगाव तालुक्याती ल कामांची संख्या कमी आहे.