Jigaon Dam Project Tendernama
विदर्भ

Exclusive: प्रतिक्षा संपली; 'हा' प्रकल्प 28 वर्षांनी पूर्णत्वाकडे

टेंडरनामा ब्युरो

एकता गहेरवार

नांदुरा (विदर्भ) : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या नांदुरा (Nandura) तालुक्यातील जिगाव गावाजवळ 1994-95 मध्ये पूर्णा नदीवर मागील 28 वर्षापासून सुरू जिगाव प्रकल्प (Jigaon Dam Project) येत्या दोन वर्षांत पूर्णत्वास येणार असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. तरी सुद्धा बहुप्रतीक्षित जिगाव प्रकल्प कधी पूर्ण होईल हे प्रकाल्पचे काम झाल्यावरच समोर येईल. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या अंतर्गत या प्रकाल्पचे काम सुरू आहे. तापी खोऱ्याच्या पूर्णा उपखोऱ्यात हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पामध्ये 15 उपसा सिंचन योजना असून त्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव, शेगांव, जळगांव (जा), संग्रामपूर, मलकापूर आणि नांदुरा या 8 तालुक्यातील 287 गावातील व अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हारा या 2 तालुक्यातील 19 गावातील एकूण 1,16,770 हे. क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे. 

धरणाचे व सांडव्याचे काम 90 टक्के पूर्ण

सांडव्यासह धरणाची लांबी 82240 मीटर आहे. माती धरणाची महत्तम उंची 35.25 मीटर इतकी आहे. सांडव्याची लांबी 292.50 मीटर असून त्यावर 15 x 12 मीटर आकाराचे एकूण 16 वक्राकार द्वारांची कामे प्रगतीपथावर आहे. अतिरिक्त सांडव्याकरीता 16 x 20 मीटरचे एकूण 6 वक्राकार दरवाजे प्रस्तावित आहेत. सद्य:स्थितीत माती धरणाचे व सांडव्याचे काम 90 टक्के पूर्ण झालेली असून घळभरणीचे काम बाकी आहे.

वक्रव्दार निर्मितीचे काम पूर्ण झाले असून क्षेत्रिय स्थळी व्दार उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. सांडव्याचे काम माथा पातळी पर्यंत पूर्ण झाले असून प्रस्तंभाचे काम 232.00 मी. तलांका पर्यंत झाले असून एकंदरीत धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे.

17 गावांचे पुनर्वसन पूर्ण

जिगाव प्रकल्पामध्ये 33 गांवे पूर्णत: आणि 14 गांवे अशंत: असे एकूण 47 गावांचे पुनर्वसन करायचे आहे. यात पहिल्या टप्प्यात 25 गावांचे पुनर्वसन करायचे असून आतापर्यंत 17 गावांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे. 4 गावांची भू संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांनी दिली.

642.96 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित

नांदुरा-खांडवी-जळगाव (ज.) रा. मा. येरळी, खामगांव-जलंब भेंडवळ, शेगांव-वरवट-टुनकी, खांडवी-भेंडवळ रस्ता, भेंडवळ वरवट रस्ता, पहुरपूर्णा भास्तान रस्ता या पुलांच्या आणि रसत्यांच्या कामाकरीता डिसेंबर 2022 अखेर 642.16 कोटी निधि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेला आहे.

जून 2024 पर्यंत धरणात जलसाठा निर्माण करणार 

45 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे निश्चित करून जिगाव प्रकल्प पूर्णत्वाकरिता हळूहळू समोर जात आहे. नागपुरात झालेल्या अधिवेशनात या प्रकल्पासाठी 900 कोटी निधी मिळाला होता. संपूर्ण निधी भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामात खर्च झाल्याची माहिती  खामगांव चे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांनी दिली. सोबतच त्यांनी सांगितले की, सध्या 2 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून त्यातून 800 कोटीचे पुनर्नियोजन आहे. 

प्रकल्पा वर झालेला खर्च

सध्या प्रकल्पाची अद्यावत किंमत 15469.300 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 अखेर पर्यंत प्रकल्पाच्या कामावर 5991.822 कोटींचा खर्च झाला असून आता प्रकल्पाची उर्वरित किंमत 9477.418 कोटी आहे. 2019 साली 13874.59 कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून 24 जानेवारी 2022 ला शासनाने प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याच्या फेरनियोजनास मंजुरी दिली आहे.

उपसा व सिंचन योजनांची कामे

जिगाव प्रकल्पातील एकूण 15 उपसा सिंचन योजना पैकी 12 उपसा सिंचन योजनांचा प्रथम टप्यात समावेश आहे. सदर उपसा सिंचन योजनांची सहा गटामध्ये विभागणी करण्यांत आली आहे. एकूण 15 पंपगृहापैकी 7 पंपगृहे स्थापत्य कामे पूर्ण झालेले असुन 8 पंपगृहे कामे प्रगतीपथावर आहेत. उर्ध्वगामी नलिकांच्या कामासाठी 95 टक्के पाईप निर्मिती व उभारणीसह काम पूर्ण झालेले आहे. 

जिगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन करण्याचे नियोजित असून एकूण 1,16,770 हे. पैकी 45,000 हे. चे संकल्पन पूर्ण झालेले आहे. 

पाणी पुरवठा योजना

महाराष्ट्र जिवन प्राधीकरण विभाग, बुलढाणा मार्फत 13 गावांची योजना पूर्ण झालेली आहे. डावा तीरा वरीला 15 गावे योजना प्रस्तावीत असून काम प्रगती पथावर आहे. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजना व राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन हा सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर गेल्या 28 वर्षांपासून साकारत आहे. 

जिगाव लवकर पूर्णत्वास गेल्यास घाटाखालील शेतकरी समृद्ध होणार यात शंका नाही. या महत्वकांक्षी बहुप्रतीक्षित जिगाव प्रकल्पाच्या लवकर पूर्णत्वाची विदर्भवादी आतुरतेने वाट बघत आहेत.