नागपूर (Nagpur) : उपराजधानीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गोंडवाना संग्रहालयाला 18 वर्षांनंतर जागा मिळाली. आदिवासी विकास विभागाने जागेवर कुंपणही घातले. फक्त भूमिपूजनची प्रतीक्षा असताना रामटेकच्या आमदारांच्या प्रस्तावावर हे गोंडवाना संग्रहालय पारशिवनी तालुक्यातील चारगाव या जंगलाच्या भागात उभारण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. विशेष म्हणजे हे संग्रहालय शहरात उभारण्यात यावे, यासाठी आदिवासी विकास परिषदेने भरपूर प्रयत्न केले. 2018 मध्ये त्याला यशही आले. पण 21 वर्षांनंतर पुन्हा त्याला विराम लागला.
आदिवासींची कला, जीवन, सांस्कृतिक जतन व संवर्धन, बोलीभाषा संवर्धन, जीवनमान, पेहराव, प्रथा परंपरा, चालीरीती, संशोधन आदींना बळकटी देण्याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने 2002 ला मान्यता दिली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमाने हे संग्रहालय उभारण्यात येणार होते. केंद्र सरकारकडून संग्रहालय बांधण्यासाठी तेव्हाच 21 कोटींचा निधी आदिवासी विकास विभागाला प्राप्त झाला होता. त्यानंतर या संग्रहालयासाठी जागेचा शोध सुरू झाला. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला संग्रहालयाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंबाझरी रोड येथील जागा निश्चित केली. तेथे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले, मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय केला. पण विद्यापीठाने न्यायालयातून आपली जागा परत मिळविली.
नंतर चिखली येथील जागा, अपर आयुक्त निवास सिव्हिल लाइन्स येथील जागा, शासकीय दूध योजना परिसर, गोरेवाडा येथेही संग्रहालय उभारण्यासाठी विचार झाला. किमान 16 वर्षे जागेचा शोध सुरू होता. आदिवासी समाज संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने 2018 मध्ये सुराबर्डी अमरावती रोड येथे 12 एकर जागा आदिवासी विकास विभागाला मिळाली. सुराबर्डी येथे संरक्षण भिंत बांधण्यात आली. दरम्यान, सरकार बदलत गेले, अनेक मंत्री बदलले. मात्र, सुराबर्डी येथील जागेचे भूमिपूजन करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीला वेळ मिळाला नाही. अखेर 21 वर्षांच्या दीर्घ प्रवासानंतर आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी 27 जुलै 2023 रोजी एक पत्र काढून गोंडवाना सांस्कृतिक केंद्र व प्रशिक्षण उपकेंद्र सुराबर्डी, नागपूर ऐवजी चारगाव तालुका पारशिवनी येथे उभारण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे आदिवासी समाज संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाने समाजाच्या तोंडाला पाने पुसली, अशी भावना समाजाची आहे.
जंगलात राहणाऱ्या आदिवासींची संस्कृतीची अनुभूती उपराजधानीत येणाऱ्यांना व्हावी, या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची उभारणी शहरात झाल्यास आदिवासींच्या कलेला चालना मिळेल, आदिवासी युवकांना रोजगार मिळेल, असा होता. ज्या गोंड राजे बक्त्त बुलंद शहा यांनी नागपूर नगरीची स्थापना केली. त्यांच्याच वंशजांना नागपूर नगरीत जागा मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे. असे म्हणणे आहे ए. भा आदिवासी विकास परिषदचे अध्यक्ष दिनेश शेराम यांचे. आमदार आशिष जैस्वाल यांचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांचा पत्रात संग्रहालय पारशिवनी तालुक्यातील चारगाव येथे उभारण्यात यावे, असा प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे.