गोंदिया (Gondia) : गोंदिया - आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई - हावडा मार्गावर असलेले रेल्वे फाटक मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी डोकेदुखी ठरते आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. त्यातच सध्या आमगाव - गोंदिया रस्त्याचे रुंदीकरणासह नव्याने बांधकाम होत असल्याने या मार्गाला 'अच्छे दिन' येणार आहेत. मात्र, रस्त्याचे नव्याने बांधकाम होत असतानाच रेल्वेच्या उड्डाणपुलाचेही बांधकाम होईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाजारपेठेचे केंद्र असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमी असते. येथील राज्य मार्गावरून सालेकसा डोंगरगड तर आमगाव देवरी ते रायपूर कलकत्ता हा महामार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे माल वाहतूक व प्रवाशी वाहनांची वर्दळ या मार्गावर सतत असते. परिणामी, या राज्य मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरणाबरोबरच नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, या मार्गावर असलेल्या किडंगीपार येथील रेल्वे फाटकावर प्रत्येक 10 मिनिट थांबावे लागते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाची मागणी आहे.
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही समस्या प्रलंबित आहे. किडंगीपार येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल व्हावे, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. नेतेमंडळी, रेल्वे प्रशासन यांच्याकडे मागणी रेटून धरण्यात आली; परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना होत आहे.