Gondia Tendernama
विदर्भ

Gondia : 'या' उड्डाणपुलाने वाढवली कोंडी, भूमिगतमार्गे जाणे होतेय भारी!

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : गोंदिया शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडण्यात आला; पण या पुलाचे बांधकाम सुरू झाले नव्हते. त्यानंतर शहरवासीयांची ओरड वाढल्याने पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्यामुळेच या पुलाचे बांधकाम कसे सुरू झाल्याचे दाखविण्यासाठी पत्रकबाजी केली. मात्र, यानंतरही या पुलाच्या बांधकामाला गती आलेली नाही.

चार महिन्यांच्या कालावधीत या पुलाचा एक साधा पिलरसुद्धा उभा झाला नाही, पुलाचे काम कासव गतीने सुरू असल्याने शहरातील वाहतूक सध्या अंडरग्राउंडमार्गे सुरू आहे; पण या मार्गावरून जाताना नागरिकांना अडचणीचे जात आहे. त्यामुळे उड्डाणपुलाने वाढविली वाहतूक कोंडी अन् अंडरग्राउंडमार्गे जाणे होतेय भारी, असेच चित्र आहे.

गोंदिया शहराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. शहरात कुठलेही विकासकाम मंजूर झाले, तर ते आपल्यामुळेच कसे मंजूर झाले, हे सांगण्यासाठी नेतेमंडळी लगेच प्रसिद्धिपत्रक काढून त्याचे श्रेय घेण्याची संधी सोडत नाहीत, राजकारणात हे गैर नसेलही, तर मग जी कामे रखडली आहेत, ती मार्गी लावण्यासाठी अथवा ते का संथ गतीने सुरू आहे, हे सांगण्यासाठी कुणी पुढे येत नाही. निवडणुकीतही हा विषय गाजला होता. गोंदिया शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो वाहतुकीसाठी तीन वर्षांपूर्वी बंद केला.

यानंतर वर्षभरापूर्वी हा पूल पाडण्यात आला. त्यामुळे शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या या पुलाअभावी दोन्ही भागांचा संपर्क तुटला, रेलटोली, मरारटोली, रामनगर, कुडवा या परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी अंडरग्राउंडशिवाय पर्याय उरला नाही; पण अंडरग्राउंड पुलाखाली नेहमीच पाणी साचून असते. त्यामुळे या पुलाखालून येणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच झाले आहे. तर नवीन उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने किमान दोन वर्षे तरी हा पूल तयार होण्याची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे दोन वर्षे पुन्हा शहरवासीयांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. या पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू असताना त्याला गती मिळावी म्हणून श्रेयवादाच्या लढाईत अग्रेसर असलेले नेतेसुद्धा गप्प असल्याचे चित्र आहे, तर आपल्याच वजनामुळे हा पूल मार्गी लागणारेसुद्धा यावरून पाठपुरावा करताना दिसत नाहीत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त असून, श्रेयवादाच्या लढाईत अग्रेसर असलेले नेते आता गेले कुठे, असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत.

संथ गतीच्या कामाचे श्रेय कोण घेणार ?

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलाचे काम मागील चार महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे याचे श्रेय घेण्यासाठी मात्र कुणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

एकाच कंत्राटदाराकडे तीन कामे : 

शहरातील उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने याच मार्गावरील अजून दोन पुलांचे कंत्राट घेतले असल्याची माहिती आहे. त्यामुळे कंत्राटदाराने गोंदिया-बालाघाट मार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाण- पुलाला प्राधान्य न देता इतर दोन पुलांकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे चित्र आहे.