Gondia Tendernama
विदर्भ

Gondia : उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलावर पडले खड्डे; बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : वन्यप्राण्यांच्या अधिवासामुळे राष्ट्रीय महामार्ग 53 वर तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे (Flyover) लोकार्पण होण्यापूर्वीच मोठे भगदाड पडल्याने उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण घाटाजवळ उड्डाणपूल तयार करण्यात आले असून, या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. परंतु पुलाच्या एका बाजूला मोठा खड्डा पडल्याने तो मार्ग बंद करण्यात आला आहे. पुलावरील दुसरा मार्ग सुरू करण्यात आला असून, एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. 

वन्यजीवाच्या रक्षणाकरिता वन्यजीव क्षेत्रात शिरपूर ते साकोली (मोहघाटा) पर्यंत अग्रवाल ग्लोबल कंपनीला चार उड्डाणपूल तयार करण्याचे टेंडर मिळाले आहे. याअंतर्गत मोहघाटा, शिरपूर शशीकरण घाटातील पुलाचे काम पूर्ण झाल्याने या पुलावरून लोकार्पण होण्यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु शशीकरण घाटातील पुलावर मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने कंपनीने हा मार्ग बंद केला आहे.

बांधकामाच्या गुणवत्तेवर उठले प्रश्न : 

लोकार्पण होण्यापूर्वीच पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.