Gondia News गोंदिया : महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर (Smart Prepaid Meter) लावण्याच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. कुठे आंदोलन केले जात आहे, तर कुठे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन दिले जात आहे. तर राज्यात काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या घरी मीटर लावण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कर्मचारी सुद्धा प्रीपेड मीटरला विरोध करत आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात शासकीय कार्यालये, शहरी भागातील ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहे. ही एकप्रकारे जनतेची दिशाभूल असून, या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
महावितरणकडून जुने विद्युत मीटर बदलवून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे वीजग्राहकांमध्ये प्रचंड रोष आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याचे पाहता राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात याबाबत कुठलाही जीआर काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे सरकारकडून वीजग्राहकांची दिशाभूल केली जात आहे.
स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द केला नसून हे मीटर लावण्याचे काम जिल्ह्यात सुरूच आहे. त्यामुळे शासनाने ही दिशाभूल बंद करून त्वरित स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करून त्यासंबंधीचा जीआर काढण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनसोड यांनी केली.
निवेदनातून या केल्या मागण्या...
स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर लावण्याचे काम त्वरित बंद करण्यात यावे. सबसिडीवर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्यावे. अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करून त्यांचे अतिक्रमण नियमित करावे. रब्बी हंगामातील धानाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करून त्यांना वनविभागाकडून होणारा त्रास दर करावा.