Sanjay Rathod Tendernama
विदर्भ

Gondia : मंत्री संजय राठोड यांची घोषणा; 57 कोटींतून होणार 444 तलावांचे...

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : माळी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील 444 मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 57 कोटी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

2023-24 मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन व दुरुस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षांच्या नियोजनानुसार दोन हजार 398 मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, प्रत्येक जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) उपस्थित होते.

राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाबाबत आढावा घेऊन गोंदिया जिल्ह्यातील 444 तलावांच्या पुनरुज्जीवन व योजनांची दुरुस्तीसाठी 57.61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे, तर बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कामे दर्जेदार होण्यावर भर द्या :

मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे करताना ती संबंधित सर्व कामे दर्जेदार होतील यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे. अनुभवी व्यक्त्तीमार्फत उत्तम दर्जाची व्हावीत यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री संजय राठोड यांनी केल्या आहेत.

सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत :

गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दीड हजारावर मामा तलाव आहे. मात्र, यापैकी बऱ्याच तलावातील गाळाचा उपस आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या तलावांची सिंचन क्षमता कमी झाली आहे. मात्र, आता जिल्ह्यातील 444 तलावांचे पुरुज्जीवन केले जाणार असल्याने सिंचन क्षमता वाढून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.