Gondia Tendernama
विदर्भ

Gondia : उड्डाणपूल होईल तेव्हा होईल, आधी रस्ता दुरुस्त करा; अन्यथा... 

टेंडरनामा ब्युरो

Gondia News गोंदिया : सडक-अर्जुनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी तयार करून दिलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करून देखील कंत्राटदार आणि संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी उड्डाणपुलाचे काम होईल तेव्हा होईल; पण आधी रस्ता दुरुस्त करा, अशी मागणी केली आहे.

सौंदड येथील उड्डाणपुलाच्या बांधकामानंतर सुरू केलेले साकोली, लाखनी येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले तर मासुलकसा घाट, शशीकरण पहाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सौंदड येथील पुलाचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. 

या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत; पण त्याची अद्यापही दुरुस्ती न करण्यात आल्याने या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उड्डाणपुलाच्या एका बाजूला तयार केलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी दर तासाला वाहतुकीची कोंडी होते.

परिणामी वाहन चालक आणि गावकऱ्यांना याचा फटका बसत आहे. उड्डाणपुलाचे काम होईल तेव्हा होईल; पण त्या आधी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी कंत्राटदार आणि संबंधित विभागाकडे केली आहे.

अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

सौंदड येथील उड्डाणपूल परिसरातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास गावकऱ्यांच्यावतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार व संबंधित विभागाला दिला आहे. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती नाही केली तर आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानीय नागरिकांनी दिली आहे.