गोंदिया (Gondia) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरला सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने 1996 मध्ये मध्य प्रकल्प विभागाने झाशीनगर उपसा सिंचन योजना अमलात आणली. सुरवातीला या प्रकल्पाची किंमत 14 कोटी 43 लाख रुपये होती; पण 27 वर्षांचा कालावधी लोटूनही हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने या प्रकल्पाची किंमत आता 127 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर अद्यापही या प्रकल्पाच्या सिंचनासाठी मिळत नसल्याने हा प्रकल्प केवळ नाममात्र ठरत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी सिंचन विभागाच्या मध्यम प्रकल्प कार्यालयाने 1996 मध्ये झाशीनगर उपसा सिंचन योजना अमलात आणली. या प्रकल्पासाठी 14 कोटी 43 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
यानंतर कामाला सुरवात करण्यात आली. मात्र, या योजनेचे काम सुरू असतानाच नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. परिणामी, या प्रकल्पाचे काही क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने अडचण निर्माण झाली. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागात काम करण्यासाठी फाइल वन विभागाकडे पाठविण्यात आली. त्याला बराच विलंब झाल्याने हा प्रकल्पाच्या कामात बाधा निर्माण झाली व तेव्हापासून या योजनेला ग्रहण लागले.
हे ग्रहण अद्यापही सुटले नसल्याने 27 वर्षांचा कालावधी लोटूनही हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 4225 हेक्टर होती. विशेष म्हणजे या प्रकल्पातून रब्बी हंगामात 150 हेक्टरला पाणी देण्यात आले होते. या योजनेचा लाभ 12 गावांतील शेतकऱ्यांना होणार होता.
लवकरच 300 मीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, तीन गावांना पाणी मिळण्याचा मात्र मोकळा होणार असल्याचे या विभागाच अधिकारी सांगतात, तर योजनेचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होणार आणि शेतकऱ्यांना पाणी मिळणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
14 किमीचा कालवा तयार करणार
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यासाठी 14 किमीचे कालवे तयार करण्यात येणार होते. सध्य स्थितीत 3 किमीच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित कामासाठी वन विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर येरंडी, जब्बारखेडा, पवनी, कोहलगाव, धाबेटेकडी, जांभळी, चुटिया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोदी, रामपुरी या गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
अर्धनग्न आंदोलन करून वेधले होते लक्ष
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम मागील 27 वर्षांपासून रखडले आहे. परिणामी, 12 गावांतील शेतकरी सिंचनापासून अद्यापही वंचित आहे. या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून या प्रकल्पाच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते.