PM Awas Yojana Tendernama
विदर्भ

Gondia : गोंदिया जिल्ह्यातील 'या' 343 नागरिकांना मिळणार हक्काचे घर

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती घटकातील 343 पात्र लाभार्थी कुटुंबांच्या घरकुलांना मंजुरी व प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

भटक्या जमाती, विमुक्त जाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी गोतमारे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. सभेत जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती घटकातील 343 पात्र लाभार्थी कुटुंबाच्या घरकुलांना मंजुरी व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

मंजुरी जिल्हाधिकारी गोतमारे यांच्या अध्यक्षतेत मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रतिनिधी वैशाली खोब्रागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी कुणाल गोंडचवर, जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे प्रतिनिधी एस. वाय. माटे, अशासकीय सदस्य अदासी येथील संतोष किसननाथ तांबू व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

1.20 लाख रुपयांचे मिळते अनुदान

योजनेअंतर्गत ग्रामीण भागात किमान 10 कुटुंबांसाठी सामूहिक वसाहत योजना राबवून अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरूपात लाभ देण्यात येतो. योजनेअंतर्गत 269 चौ. फुटांचे पक्के घराच्या बांधकामाकरिता लाभार्थीना एक लाख 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. घरकुल योजनेकरिता जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी संबंधित पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय येथे 31 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे मोहतुरे यांनी कळविले आहे.