Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

कचरा घोटाळ्याचा अहवाल; बंद लखोट्‍यात दडलंय काय?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागरिकांच्या घराघरातून कचरा गोळा करणाऱ्या बीव्हीजी आणि एजी या दोन कंपन्यांनी केलल्या घोटाळ्याचा अहवाल महापौरांकडे सादर करण्यात आला आहे. आता या बंद लखोट्‍यात दडलंय काय याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी शहरात कचरा घोटाळा होत असल्याचा आरोप सभागृहात केला होता. त्याला सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी साथ दिली होती. त्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. समितीने गुरुवारी बंद लिफाफ्यात समितीचा अहवाल सादर केला आहे. सुमारे साठ पानांच्या अहवालात सात पाने निष्कर्षाची आहेत. आगामी महापालिकेच्या सभेत हा बंद लखोटा उघडण्यात येणार आहे.

सुमारे १५ वर्षे नागपूर महापालिकेत कनक रिसोर्सेस या कंपनीच्यावतीने कचरा संकलन केला जात होता. मात्र महापालिकेची निवडणूक जवळ येताच कचरा उचल करणाऱ्या कंपनीच्या विरोधात सर्वच पक्ष एकवटले आहेत. निवडणूक झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होत होते. कनक कंपनीला या मागचे रहस्य आणि हेतू चांगला ठाऊक होता. मात्र दिवसेंदिवस मागण्या वाढू लागल्या. उत्पन्नापेक्षा मागणीच जास्त होऊ लागल्याने एक दिवस कनक कंपनीने स्पष्ट शब्दात ‘हप्ता‘ देण्यास नकार दिला. परिणाम जो व्हायचा तो झाला.

त्यानंतर एकाऐवजी दोन कंपन्या कचरा संकलनासाठी महापालिकेने नेमल्या. त्यात अर्धे शहर बीव्हिजी आणि अर्धे एजी या कंपनीला देण्यात आले. सारेकाही सुरळीत सुरू असताना काही ज्येष्ठ नगरसेवकांना कंपन्यांचा घोटाळा दिसू लागला. विशेष म्हणजे दोन महिन्यांवर महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वांचीच त्यांना साथ लाभली आहे. एकाने आरोप करायचे आणि लगेच त्याची दखल घेऊन चौकशी समिती नेमायची हा प्रकार महापालिकेला नवा नाही. हा अहवाल वेळेत सादर होईल अशी अपेक्षा नव्हती. आता तो सादर झाला असला तरी पुढील महापालिकेच्या सभेत तो येईलच याचीसुद्धा कोणाला शाश्वती नाही.