नागपूर (Nagpur) : गणेश टेकडी उड्डाणपूल पाडून मोठा रस्ता प्रस्तावित आहे. परंतु येथील दुकानदारांचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यांत बैठक घेऊन दुकानदारांना पैसे किंवा पर्यायी जागा देण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. अखेर आज ईश्वरचिठ्ठीने येथील २३ दुकानदारांना पर्यायी दुकाने उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग मोकळा झाला.
गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. येथील काही दुकानदारांनी विरोध केला. एवढेच नव्हे त्यांनी अवास्तव मागण्या केल्या. त्यामुळे गणेश टेकडी उड्डाणपूल तोडण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील महिन्यात १ एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाबाबत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. येथील दुकानदारांना पर्यायी जागा किंवा पैसे देण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. आज महापालिकेच्या बाजार विभागाने उड्डाणपुलाखालील बाधित होणाऱ्या परवानाधारक दुकानदारांपैकी २३ जणांना महामेट्रोद्वारे बांधण्यात आलेली दुकाने दिली. यासाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला. उपायुक्त मिलिंद मेश्राम, मालमत्ता कर विभागाचे सहायक अधीक्षक संजय दहीकर यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
मनपाच्या सभागृहामध्ये महामेट्रोद्वारे बांधण्यात आलेल्या दुकानांमध्ये या परवानाधारकांची पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी उड्डाणपुलाखालील परवानाधारकांना मनपाद्वारे नोटीस देउन त्यांची सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीनंतर परवानाधारकांच्या सूचनेनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे पर्यायी जागेचे आवंटन करण्याचे निश्चित झाले होते. एकूण परवानाधारकांपैकी २३ परवानाधारकांनी ईश्वरचिठ्ठी प्रक्रियेत सहभाग घेतला. ईश्वरचिठ्ठीत आलेल्या क्रमानुसार परवानाधारकांना पर्यायी जागेतील पसंतीचे दुकान निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार परवानाधारकांनी आपल्या पसंतीची दुकाने निवडली. या प्रक्रियेसाठी बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, धीरज ढोके व बाजार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
३० वर्षांसाठी बांधलेला पूल १२ वर्षांत तोडणार
गणेश टेकडीपुढील उड्डाणपूल २०१० मध्ये बांधण्यात आला. ३० वर्षांसाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. परंतु या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या व येथून जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल तोडून रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १२ वर्षांमध्येच हा पूल तोडण्यात येणार आहे. यापूर्वी मेट्रोसाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्यात आला.