Nitin Gadkari DEvendra Fadnavis Tednernama
विदर्भ

गडकरींचा कामाचा धडाका! असा दूर केला नागपुरातील 'या' भागाचा बॅकलॉग

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उर्वरित शहराच्या तुलनेत अनेक वर्षांपासून पूर्व नागपूर तसे मागासलेले. मात्र नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची या भागावर मेहरबानी झाली आहे. या एकाच मतदारसंघात त्यांनी सिम्बायोसिस कॉलेज, साई क्रीडा संकुल, स्मार्ट सिटी, हायटेक, आरटीओ कार्याल, पारडी ब्रिज, मेट्रो रेल्वे, डिप्टी सिग्नल, कावरापेठ, भांडेवाडी ओव्हरब्रिज व अंडरब्रिजचे काम सुरू करून एका झटक्यात बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पूर्व नागपूरमधील पारडीवरून ते अंबाझरी इलेक्ट्रिक ए.सी. बस आणि ब्रॉडगेज ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पोलीस स्टेशन, फायर स्टेशन व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे निर्माण अत्याधुनिक हॉस्पिटलचे निर्माण होणार आहे. कळमना येथे १६ एकर जागेवर अत्याधुनिक किराणा मार्केट तयार केले जात आहे. नेदरलँडच्या आर्किटेक्टने या मार्केटचे डिझाईन तयार केले आहे. अवघ्या काही वर्षातच पूर्व नागपूर विकासाचे नवे मॉडेल म्हणून अस्तित्वात येईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एस. एस. मणियार कॉलेज, जवाहरलाल दर्डा स्कूल, वि. सी. ए. ग्राउंड पासून ना.सु.प्र. हॉटमिस्ट प्लांट पर्यंत १६ कोटींच्या सिमेंट रोडच्या कामाची सुरवात झाली आहे. याकरिता १४ कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यास व केंद्रीय निधी (CRF) मधून दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. मिनिमातानगर, डिप्टी सिग्नल, सूर्यनगर येथे जुनी इंग्रजाच्या काळातील गडरलाईन असून जीर्ण झाल्यामुळे ६० लाख रुपयाच्या गडरलाईनचे कामसुद्धा सुरू करण्यात आले. एकूण ३० कोटी रुपयाच्या कामाची सुरवात गडकरी यांनी केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक निधी वाटप करण्यात आला. नागपूर महापालिकेने तब्बल शंभर कोटी रुपये या मतदारसंघाला विकास कामांसाठी दिले होते. त्यामुळे इतर भागातील आमदार आणि नगरसेवक नाराज होते. मात्र मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असल्याचा फायदा पूर्व नागपूरला झाला. सिम्बॉयसिसला पूर्व नागपूरमध्ये जागा देण्यात आली. आता तेथे कँम्पस सुरू झाले आहे. साई क्रीडा संकुलासाठी शंभर एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्याचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प हा पूर्व नागपूरमध्येच राबविला जात आहे. त्यामुळे जुन्या वस्त्यांचा लूक एकदम बदलला आहे.